इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव
By admin | Published: March 27, 2017 03:17 AM2017-03-27T03:17:55+5:302017-03-27T03:17:55+5:30
शासनाने १९९४ मध्ये बंद केलेल्या ‘इलेक्ट्रोहोमिओपॅथी’ या वैद्यकीय शाखेला पुन्हा मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर
पुणे : शासनाने १९९४ मध्ये बंद केलेल्या ‘इलेक्ट्रोहोमिओपॅथी’ या वैद्यकीय शाखेला पुन्हा मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार ‘मेडिकल असोसिएशन आॅफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी’कडून केंद्राला सविस्तर प्रस्ताव ३० जूनपूर्वी सादर करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाला पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत मसुदा तयार करण्याबाबत चर्चा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ५०० इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या चिकित्सकांची बैठक रविवारी पुण्यात पर्वती पायथा परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कूल आॅडिटोरियम येथे आयोजित केली होती. या बैठकीला पंजाब येथील डॉ. अजित सिंग, कोलकत्ता येथील डॉ. देबाशिश कुडूंजी यांनी इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सापद्वतीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रस्ताव तयार करण्याबाबत ऊहापोह करण्यात आला.
या पॅथीचे शिक्षण घेतलेले राज्यात ३० हजार प्रशिक्षणार्थी आहेत. हे शास्त्र ११४ वनस्पतींवर आधारित असून १३८ प्रकारची औषधे तयार करण्यात येतात आणि ते कुठल्याही आजारावर वापरता येतात. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे प्रशिक्षणार्थी या पॅथीची प्रॅक्टिस करू शकतात, अशी माहिती संघटनेने दिली आहे.
भारतातील सर्व इलेक्ट्रोहोमिओपॅथी तज्ज्ञांची बैठक १५ एप्रिल २०१७ रोजी दिल्ली येथे आयोजिण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये संबंधित प्रस्ताव तयार करून त्यावर पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर तो प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतीश जगदाळे यांनी दिली.