येरवड्यात २२ कोर्ट हॉलची इमारत उभारण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 08:44 PM2018-09-22T20:44:43+5:302018-09-22T20:47:08+5:30
येरवडा येथे न्यायालयाची नवीन इमारात उभारण्यासाठी नुकतीच एक एकर जागा देखील मंजूर करण्यात आली आहे.
पुणे : येरवडा येथे न्यायालयाची नवीन इमारात उभारण्यासाठी नुकतीच एक एकर जागा देखील मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी आणखी एक एकर जागा देण्याची मागणी न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आली असून त्यावर २२ कोर्ट हॉलची तीन मजली प्रशस्त इमारत उभाण्याचा प्रस्ताव आहे.
शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात असलेले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कार्ट येरवडा येथे हलविण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा न्यायालयाच्या विस्ताराकरीता येरवडा येथे एक एकर जागा देण्याचा आदेश जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने काढला आहे. विस्तारासाठी जागा मिळण्याबाबत जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश यांनी २०१७ मध्ये अर्ज केला होता. त्यात येरवडा आणि शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील जागांची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत तहसीलदार यांनी चौकशी आहवाल सादर केला. त्यात येरवडा येथील जागेच्या सातबारा उताºयावर कब्जेदार सदरी सरकार अशी नोंद असून ती न्यायायलयाच्या विस्तारासाठी देण्यास देण्यास हरकत नसल्याचे कळविले होते. याप्रकरणी विधी व न्याय विभाग, नगर विकास विभाग, वित्त विभाग यांनी दिलेल्या अभिप्रार्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार पुणे जिल्हा न्यायालयाच्या विस्ताराकरीता येरवडा येथील एक एकर जागा विधी व न्याय विभागास विनामुल्य देण्यास हरकत नसल्याचे कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विनामुल्य व कब्जेहक्काने येरवडा येथील जागा विधी व न्याय विभाग (जिल्हा न्यायालय पुणे) यांना देण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र, त्याठिकाणी बांधकामासाठी १ एफएसआय मंजूर आहे. त्यामुळे मंजूर जागेत केवळ १२ कोर्ट हॉलचे बांधकाम करता येवू शकते. त्यामुळे याच जागेला लागून आणखी एक एकर जागा देण्यात यावी, अशी मागणी न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. एकूण दोन एकर जागा मिळाल्यास येरवड्यात २२ कोर्ट हॉल असलेली तीन मजल्यांची प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे.
येरवड्यातील जागेत पुढील ५० वर्षांचा विचार करून न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या बाबी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. पुरेसे पार्किंग, कॅन्टीन, चांगली स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय अशा बाबी याठिकाणी पुरविण्यात येणार आहेत. इमारत बांधून पुर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयातील सर्व प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी कोर्ट नवीन ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यामुळे येरवडा कारागृहातील आरोपींना न्यायालयात हजर करणे सोपे होणार आहे. तसेच महत्वाच्या खटल्यांमधील आरोपींना देण्यात येणा-या सुरक्षेत देखील घट करता येणे शक्य होणार आहे.
...............
बराकीच्या ठिकाणीही १५ हजार चौरस मीटर बांधकाम शक्य
न्यायालयातील पोलीस चौकी ते पुणे बार असोसिएशनच्या कॅन्टीनपर्यंतच्या जागेत नवीन इमारत उभारण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि न्यायालय प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे. सर्व परवानण्यांची पुर्तता झाल्यानंतर या जागेवरील बराकी पाडून त्याठिकाणी महानगरपालिकेच्या १.५ एफएसआय नियमानुसार १५ हजार १२० चौरस मीटर बांधकाम करता येऊ शकते.