संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:08+5:302021-01-02T04:10:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अद्याप दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यांच्याबाबत योग्य तो तपास करून रीतसर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.
गृहमंत्री देशमुख यांनी येरवडा कारागृहाला शुक्रवारी (दि. १) भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, शरद खटावकर, तसेच कारागृह अधीक्षक यू. टी. पवार उपस्थित होते. त्यानंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील सर्व कारागृहात करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कारागृह प्रशासनाने चांगले काम केले. कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या अधिक आहे. कारागृहातील कैद्यांना तात्पुरता जामीन दिल्यास कारागृहातील कैद्यांची संख्या कमी होईल, असा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार ११ हजार कैद्यांना करोनाच्या संसर्ग काळात तात्पुरते जामीन दिल्याचे त्यांनी सांगितले.
कारागृहातील कैदी कुशल कारागीर आहेत. विविध वस्तू ते तयार करतात. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी विक्री दालन सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडे मोकळी जागा उपलब्ध आहे. राज्यातील कारागृहांची क्षमता २२ हजार कैदी असताना प्रत्यक्षात ३८ हजार कैदी कारागृहात आहेत. पाश्चात्य देशाप्रमाणे महाराष्ट्रात आधुनिक कारागृह बांधण्याचा तसेच राज्यातील पोलिसांना निवासस्थाने देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. दोन्ही प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. पोलिसांना कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे, असेही देशमुख म्हणाले.
--
चौकट
दुकान बंद होऊ नये हेच फडणवीसांच्या टीकेमागचे कारण
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपणाची जबाबदारी असल्याने ते आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टीकाच करणार आहेत. परंतु फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण टीका करण्यापाठीमागे त्यांचे दुकान बंद होऊ नये हेच कारण आहे. म्हणून ते आमच्यावर टीका करत असतात, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
फोटो : येरवडा कारागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री अनिल देशमुख.