Pune | टेमघरच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे; मान्यता मिळताच सुरू होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:22 AM2023-04-27T09:22:00+5:302023-04-27T09:22:34+5:30

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी टेमघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून दुरुस्तीसाठी हे धरण लवकरच रिकामे केले जाणार आहे...

Proposal for amendment of Temghar to Cabinet for approval; Work will start as soon as approval is received | Pune | टेमघरच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे; मान्यता मिळताच सुरू होणार काम

Pune | टेमघरच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे; मान्यता मिळताच सुरू होणार काम

googlenewsNext

पुणे : टेमघर धरणातून होणारी गळती ९० टक्के रोखण्यात यापूर्वी केलेल्या उपाययोजनांतून यश आले असून उर्वरित गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. ही मान्यता मिळताच मे च्या पहिल्या आठवड्यापासून हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी टेमघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून दुरुस्तीसाठी हे धरण लवकरच रिकामे केले जाणार आहे. यासाठी धरणाच्या भिंतीवर शॉटक्रीट व ग्राऊटिंगची कामे करण्यात येणार आहेत. यापूर्वी ही कामे करण्यात आली असून त्यातून धरणाची ९० टक्के पाणीगळती रोखण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित गळती रोखण्यासाठी सध्याचा पाणीसाठा रिकामा करावा लागणार आहे. त्यानंतर शॉटक्रीट व ग्राऊटिंगची कामे करण्यात येतील. मात्र, पावसाळ्यापूर्वी उपलब्ध असलेल्या दोन महिन्यांमध्ये यातील थोडे काम होईल. उर्वरित काम पुढील वर्षी करण्यात येणार असल्याचे कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

पुणे शहराला खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. त्या प्रकल्पांतर्गत टेमघर धरण असून त्याची क्षमता ३.७१ टीएमसी आहे. या धरणातून २०१६ मध्ये पाणी गळती होत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर २०१७ पासून प्रत्यक्षात धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात आली होती. विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सिमेंट आणि इतर रासायनिक मिश्रण धरणाच्या भिंतींमध्ये निर्माण झालेल्या पोकळ्यांमध्ये सोडून त्याद्वारे धरणातील पोकळ्या भरून काढण्याच्या पद्धतीस ‘ग्राऊटिंग’ असे म्हणतात. तसेच धरणाच्या पाण्याकडील बाजूस विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सिमेंट आणि इतर रासायनिक घटकांच्या मिश्रणातून तयार केलेल्या कॉंक्रिटचा लेप देण्यासाठी मिक्स संकल्पन आणि विशिष्ट कार्यपद्धती विकसित करण्यात आली. त्याला ‘शॉटक्रीट’ असे म्हटले जाते. ‘शॉटक्रीट’मुळे धरणातील पाणी पाझरून धरणात जाण्यास अटकाव होतो. केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या माध्यमातून आणि तज्ज्ञांच्या पॅनलच्या मार्गदर्शनाखाली संशोधनांतून ग्राऊटिंग आणि शॉटक्रीटचे मिक्स संकल्पन, त्यांची कार्यपद्धती विकसित करण्यात आली.

राज्य सरकारने टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीचा निधी कामाअभावी परत गेला आहे. त्यामुळे यंदा दुरुस्तीची कामे करून निधी खर्च केला जाईल. मंत्रिमंडळाची मान्यता मिळताच टेमघर धरणाच्या कामाला सुरुवात होईल. नोव्हेंबरमध्ये धरणातील पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर पुन्हा धरणाच्या वरील भागातील दुरुस्तीची कामे करता येतील.

प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प

Web Title: Proposal for amendment of Temghar to Cabinet for approval; Work will start as soon as approval is received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.