मालोजीराजेंच्या इंदापूर येथील गढीच्या जीर्णोद्धर आणि संवर्धनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे
By नितीन चौधरी | Published: November 27, 2023 06:36 PM2023-11-27T18:36:09+5:302023-11-27T18:37:35+5:30
वाड्यासह तेथील स्थळाचे जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्याचा ३८ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे
पुणे: जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि छत्रपती शहाजी राजे यांचे वडील मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर येथील गढीच्या (वाडा) जीर्णोद्धर आणि संवर्धनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव सुमारे ३८ कोटींचा असून या निमित्ताने मालोजीराजे यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय साकारण्यात येणार आहे.
इंदापूर हे शहाजीराजे तसेच आजोबा मालोजीराजे यांची ही जहागिरी मानली जात होती. मालोजीराजे इंदापूर येथे लढाईत मरण पावले. त्यामुळे उजनी आणि भीमा नदीच्या जवळ असलेल्या इंदापूर शहराला ऐतिहासिक महत्त्व त्यामुळे प्राप्त झाले आहे. या ठिकाणी मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक गढी अर्थात वाडा जीर्ण अवस्थेत झाला आहे. त्या वाड्यासह तेथील स्थळाचे जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. सुमारे ३८ कोटी रुपयांचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाने तयार केलेल्या या डीपीआरला मान्यता दिली आहे. त्याला मान्यता मिळावी तसेच निधी उपलब्ध व्हावा याकरिता राज्य सरकारकडे हा प्रस्ताव महिन्यापूर्वी पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप सरकारची मान्यता मिळाली नाही. या प्रस्तावासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असून मंत्रालयातील सचिवांच्या समितीने मान्यता दिली आहे. आता शिखर समितीकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविली जाणार आहे. त्यामुळे लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संग्रहालय होणार
या वाड्याचा जीर्णोद्धार करताना मालोजीराजे यांच्या अनेक वस्तू नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांच्या वापरातील वस्तूंचे संग्रहालय करण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी मालोजीराजे यांचे पुतळा, मंदिर, प्रवेशद्वार, बैठे व्यवस्था, स्वयंपाक, भोजन कक्ष, फाऊंटन, तटबंदी तसेच लॉन्स आदी सोयी सुविधांचा यात समावेश असणार आहे.
कोट
मालोजीराजे भोसले यांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा तसेच त्यांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या इंदापूरमधीलच चांद शाहवली दर्गाहचा ही जीर्णोद्धार होणार आहे. हा प्रस्ताव सरकारकडे असून लवकरच अंतिम मान्यता मिळेल. - दत्तात्रय भरणे, आमदार