सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे करण्याचा प्रस्ताव द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:27 AM2021-02-20T04:27:13+5:302021-02-20T04:27:13+5:30
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभे करण्याचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनास सादर ...
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभे करण्याचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनास सादर करणे गरजेचे आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल, अशा सूचना विद्यापीठाला दिल्या आहेत, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे करण्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही या संदर्भात पाठपुरावा केला आहे. मात्र, विद्यापीठाने प्रस्ताव पाठविल्याशिवाय स्मारक उभे करता येणार नाही. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरी दिल्यानंतर विद्यापीठात स्मारक निर्माण करता येईल. त्यामुळे विद्यापीठाने लवकर यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा, अशी चर्चा विद्यापीठाच्या अधिका-यांबरोबर झाल्याचे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेनेसुद्धा विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा, या मागणीचे निवेदन सामंत यांना दिले.
सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंचे आहेत. तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वसतिगृह सुरू करण्यासाठी यूजीसीच्या नियमावलीनुसार विद्यापीठातर्फे निर्णय घेतले जातील. कोरोनामुळे वसतिगृह सुरू करण्याबाबत खबदारी घ्यावी लागेल. कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सीईटी-सेल व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिका-यांची बैठक गुरुवारी घेण्यात आली. त्यात संबंधित एजन्सी बदलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही सामंत यांनी सांगितले.
--------------------------------------------------
रोलबॉल खेळाला मिळाली मान्यता
पुण्यात उदयास आलेल्या रोलबॉल या जगभरातील ५० देशात खेळल्या जाणा-या आणि चार वर्ल्डकप झालेल्या खेळाला केंद्र व राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली. परंतु, अनेक वर्षे पाठपुरावा करूनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या खेळास मान्यता दिली जात नव्हती. अखेर पुणे जिल्हा रोलबाॅल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ या उपक्रमांतर्गत उच्च शिक्षण मंत्री यांची भेट घेवून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ विद्यापीठाच्या अधिका-यांना याबाबत मान्यतेचे निर्देश दिले आणि काही तासांत या खेळाला विद्यापीठाची मान्यता मिळाली. त्यामुळे केंद्रीय स्थरावर होणा-या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
----------------------------------------------
राज्यातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा प्रश्न सोडविण्याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू असून प्राध्यापकांना तासाप्रमाणे रक्कम देण्याऐवजी निश्चित मानधन देण्याबाबत निर्णय घेणे शक्य आहे का? याबाबत चाचपणी केली जात असल्याचे सामंत यांनी सांगितले.
---------------------------------------