भोर पंचायत समितीकडे ४ गावांचे टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर २ टँकर मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:57 IST2025-04-17T15:56:54+5:302025-04-17T15:57:17+5:30
भोर : पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे ४ ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. ...

भोर पंचायत समितीकडे ४ गावांचे टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर २ टँकर मंजूर
भोर : पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे ४ ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. पैकी २ गावांचे टँकर मंजूर झाले असून लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा सुरू झाला असून जसजसे उन्हाचा तडाखा वाढतोय तसतसी टंचाई वाढत चालली आहे.
निरादेवर धरणात २४ टक्के तर भाटघर धरणात २९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला असून दोन्ही धरणाच्या पात्रात असलेल्या विहिरी कोरड्या पडत आहेत. यामुळे धरण भागातील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. जसजसा उन्हाळा वाढतोय तसतशी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असून टँकर मागणी वाढत चालली आहे. भोर तालुक्यात साळवडे, करंदी खे.बा, वारवंड, जयतपाडची हुंबे वस्ती, शिळिंब या चार गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे.
या गावांनी टंँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. साळवडे व करंदी खे. बा. या दोन गावांचे प्रस्ताव मंजूर झाले असून मे अजित पवार वाहतुक संस्थेकडे टँकर सुरू करण्यासाठी पाठवले आहेत, तर वारवंड आणि जयतपाडची हुंबेवस्ती या गावांची टंचाईची पाहणी करण्यात आली असून भोर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सदरचे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठवले आहेत. मंजुरी मिळाल्यावर सदर गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
भोर पंचायत समितीकडे चार गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव आले असून दोन गावांचे टँकर मंजूर झाले आहेत. त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल उर्वरित गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. लवकरच त्यांना मंजुरी मिळेल. - किरणकुमार धनवाडे, गटविकास अधिकारी, भोर