इंधनावरील जीएसटीसाठी राज्यांकडून प्रस्ताव येणे अपेक्षित : शिव प्रताप शुक्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 07:56 PM2018-05-25T19:56:16+5:302018-05-25T19:56:16+5:30
देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड दरवाढीत सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे. त्यामुळे ते जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे : पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासाठी राज्यांकडून प्रस्ताव आला पाहिजे. त्याशिवाय जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होऊ शकत नाही. राज्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर त्वरित निर्णय घेऊ असे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी शुक्रवारी (२५ मे) सांगितले.
सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, महासंचालक अनंत सरदेशमुख, जीएसटीचे प्रधान सचिव ए. के. पांडे, प्रप्तीकर विभागाचे मुख्य आयुक्त विनोदानंद झा या वेळी उपस्थित होते. शुक्ला म्हणाले, इंधन दराच्या भडक्यामुळे पेट्रोल-डिझेलवर देखील जीएसटी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे इंधनाचे दर देशभरात जवळपास एकाच पातळीवर राहतील. तसेच इंधन दरातही घट होईल. मात्र, जोपर्यंत राज्यांकडून प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होणार नाही. राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यास त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल. इंधनावर केंद्र सरकारचे फारसे कर नाहीत. त्यात मुख्य वाटा हा राज्य सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावरच इंधनावरील जीएसटीचा निर्णय अवलंबून असेल.
मध्यंतरी देशात नोटतुटवडा झाल्याची स्थिती होती. त्याबाबत बोलताना शुक्ला म्हणाले, नोटटंचाईची कोणतीही स्थिती नाही. तसेच २ हजारांची नोट बंद करण्याचा देखील कोणताही विचार नाही. मध्यंतरी पाचशे रुपयांच्या नोटा बाजारात अधिक येत होत्या. नोटबंदीकाळात रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या नोटांची मोजणी अजूनही सुरु असल्याचे सांगत त्यांनी नोटबंदी काळात जमा झालेल्या नोटांवर अधिक बोलण्याचे टाळले.
---------------------
तर, जीएसटी ८ लाख कोटींवर जाईल
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी सिंगापूरसारख्या छोट्या देशाला देखील पाच वर्षे लागली. आल्या देशात एक वर्षाच्या आत नवीन करप्रणाली चांगल्या पद्धतीने लागू केली. सध्या १ लाख कोटींवर कर पोहोचला असला, तरी अगामी काही वर्षांत तो ७ ते आठ लाखांवर जाऊ शकतो. सर्व नागरिकांनी ही प्रणाली आपलीशी केली, तर हे शक्य असल्याचे शिव प्रताप शुक्ला म्हणाले.
-------------------
मोदींचा सूर्य पुन्हा उगविण्यासाठी
आम्ही चुकीचे वागलो, तर आमच्या जागी अन्य कोणी येईल. मात्र, देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी पुन्हा येणे गरजेचे आहे. देशातील जनतेची देखील मोदी हेच पसंती आहेत. गुजरातवरुन एकेकाळी मोदींना खलनायक ठरविण्यात आले आहेत. आज ते विश्ववंदनीय ठरले आहेत. त्यामुळे अगामी निवडणुकीत मोदींचा सूर्य अस्तासाठी नव्हे, तर पुन्हा उगविणार असल्याचे सांगून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी मोदींना साथ देण्याचे आवाहन उद्योजकांना केले.