प्रस्तावित सर्व्हिस रोड वादात
By admin | Published: January 22, 2016 01:29 AM2016-01-22T01:29:22+5:302016-01-22T01:29:22+5:30
शहरातील काळा ओढा ते कसबा, कारभारी सर्कलपर्यंतचा सर्व्हिस रोड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रस्तावित सेवा रस्त्या
बारामती : शहरातील काळा ओढा ते कसबा, कारभारी सर्कलपर्यंतचा सर्व्हिस रोड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रस्तावित सेवा रस्त्या (सर्व्हिस रोड) लगत मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण करून गाळेदेखील बांधण्यात आले आहेत. तरीदेखील, हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याची मागणी होत आहे. मिळकतधारकांनी या रस्त्याला हरकती घेतल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी नव्याने बीओटी तत्त्वावर रिंगरोड अंतर्गत रस्तेबांधणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीचे काम झाले. शाळा व खेळाच्या मैदानाचे आरक्षण बासनात गुंडाळून नाट्यगृहाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर काळा ओढा ते कारभारी सर्कलपर्यंत सेवा रस्ता करण्याचा ठराव नगरपालिकेने घेतला. त्यावर हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. रिंगरोड अंतर्गत रस्ता झाल्यावर परिसरात बहुतांश हॉस्पिटल झाली आहेत. त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. काहींनी व्यवसाय सुरू केले आहेत, असे असताना सर्व्हिस रस्ता करण्यास नगरपालिका आग्रही आहे. याउलट, या रस्त्यालगत झालेली बांधकामे परवानगी घेऊन केली आहेत. त्यामुळे झालेल्या बांधकामांची पाडापाड होईल. हा सर्व्हिस रस्ता रद्द करून प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार इंदापूर रस्त्यालगतच्या डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरून सुरू करावे. प्रशासकीय इमारतीच्या पुढच्या बाजूचे प्रवेशद्वार बंद ठेवून मागच्या दाराने प्रशासकीय इमारतीचे कामकाज चालते. त्याचा नागरिकांनादेखील त्रास होतो. डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे प्रयोजन काय, याची माहितीदेखील विचारण्यात आली. मिळकतधारकांच्या वतीने अॅड. शेखर दाते, अॅड. केदार पानसे, नगरसेवक सुनील सस्ते यांनी बाजू मांडली. मुख्याधिकाऱ्यांनी मिळकतधारकांच्या हरकतीवर सुनावणी घेतली. (प्रतिनिधी)