फिर्यादी पोलिसाने फिरविली न्यायालयामध्ये साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:17 AM2019-01-30T03:17:07+5:302019-01-30T03:17:16+5:30
न्यायालयाकडून कारणे दाखवा; शिवाजीनगर पोलीस लाइनमध्ये झाली होती मारहाण
पुणे : आरोपींना वाचविण्यासाठी चक्क एका पोलिसाने आणि त्याच्या वडिलांना साक्ष फिरवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आले आहे. साक्ष फिरवली म्हणून पिता-पुत्राला न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.
पोलीस विलास एकनाथ भाटे आणि त्याचे वडील एकनाथ राधाजी भाटे यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. नाशिककर यांनी नोटीस बजावण्याचा आदेश दिला. २० जुलै २०१५ रोजी शिवाजीनगरमधील जुनी पोलीस लाइन येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विलास भाटे यांना मारहाण झाली होती. बस पार्किंगवरून आरोपींनी फिर्यादीला बांबूने मारहाण केली. जखमी झाल्यामुळे फिर्यादी यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते.
त्याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून महेश मनोहर जाधव (वय २६), उमेश उत्तम काळेबाग (२६), सोनू घन:श्याम गुंड (१८, सर्व रा. जुनी पोलीस लाइन, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पंचनामा करून बांबू आणि शर्ट जप्त करण्यात आला. २७ जुलै २०१५ रोजी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. घटना झाली त्या वेळी फिर्यादी पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील एस. सी. शिंदे यांनी काम पाहिले. त्यांनी खटल्यात सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी भाटे आणि त्याच्या वडिलांच्या साक्षीचा समावेश होता.
तपासादरम्यान तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी एकनाथ भाटे, सुजाता भाटे, अशोक भाऊ बुचडे यांचे जबाब नोंदविले. त्यानंतर भारतीय दंड विधान कायदा कलम ३२४, ३२३, ५०४ नुसार आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याची सुनावणी सुरू असताना फिर्यादी भाटेने संबंधित घटना मी उपस्थितीत नसताना झाल्याचे सांगितले. तर, फिर्यादीच्या वडिलांनी उलटतपासणीत आरोपी तिथे उपस्थित नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे आरोपींना वाचविण्यासाठी खोटी साक्ष दिल्याप्रकरणी विलास आणि एकनाथ भाटे या दोघांवर कारवाई करण्यात यावी, असा अर्ज अॅड. शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार न्यायालयात चुकीची साक्ष दिल्याप्रकरणी फिर्यादी व त्यांच्या वडिलांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३४४ नुसार संबंधितांवर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे अतिरिक्त न्यायालयाने निकालात नमूद केले.
फिर्यादींना ठाम राहायला हवे होते
घटना घडल्यानंतर भाटे यांनी स्वत:च फिर्याद दाखल केली होती; मात्र घटनेच्या वेळी आरोपी तिथे नव्हतेच, अशी साक्ष फिर्यादींच्या वडिलांनी दिली. फिर्यादीने पोलिसांपुढे दिलेला जबाब आणि साक्ष देतानाचा जबाब वेगळा होता. त्यामुळे फिर्यादी आणि त्याच्या वडिलांनी संबंधित घटना खरी होती, तर त्यावर ठाम राहणे आवश्यक होते.
प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबाबतीत घडलेल्या घटनेकडे खऱ्या बाजूने ठाम राहिले पाहिजे. त्याचे मन विचलित होता कामा नये किंवा चुकीची माहिती देऊ नये. ही परिस्थिती पाहता, दोन्ही साक्षीदारांची योग्य चौकशी करणे योग्य आहे, असा युक्तिवाद अॅड. शिंदे यांनी केला.