समृद्धीने मूकबधिर आई-वडिलांच्या कष्टाचे ऋण फेडले; दहावीत उत्तुंग यश मिळविले, ९१ टक्के मार्कांचा बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:29 PM2024-05-29T12:29:16+5:302024-05-29T12:29:52+5:30
पुढच्या शिक्षणासाठी खूप खर्च असला तरी पार्टटाइम जॉब करून पुढील शिक्षण पूर्ण करणार असल्याचे समृद्धीने सांगितले
बिबवेवाडी : आयुष्यात आई- वडिलांना मुके असल्यामुळे त्यांना कामासाठी करावी लागलेली वणवण रोजच बघत समृद्धी मोठी झाली. वाट्टेल ते झाले तरी खूप अभ्यास करायचा व आई- वडिलांनी केलेल्या कष्टाचे ऋण फेडायचे, हे स्वप्न उराशी बाळगलेल्या समृद्धीने दहावीच्या परीक्षेत ९१.२० गुण मिळवत उत्तुंग यश मिळविले आणि सामान्य घरातील समृद्धीच्या मार्कांचा बोलबाला झाला.
समृद्धी सुनील भोसले, शिवशंकर सोसायटी, इंदिरानगर, बिबवेवाडी येथे राहते. आई १००% मूकबधिर असून वडील ७५% आहेत. वडील एका खाजगी कारखान्यात कामाला जातात, त्यांना मासिक १० हजार रुपये पगार मिळतो. त्यावर कसेबसे घर चालते. एवढे मार्क्स मिळालेत खरे पण पुढे काय ? असा खूप मोठा प्रश्न समोर आ-वासून उभा आहे.
सर्वांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी परिस्थितीसमोर सर्वच शून्य असते याची सुद्धा जाणीव आहे. पुढच्या शिक्षणासाठी खूप खर्च असतो हे माहीत आहे मला; पण पार्टटाइम काम करून का होईना पुढील शिक्षण पूर्ण करणार असल्याचे तिने ‘लोकमत’सोबत बोलता सांगितले. डॉक्टर व्हावे हे स्वप्न असले तरी रस्ता खूप कठीण आहे. खूप मेहनत करून आई- वडिलांनी मोठे केले आहे. त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांना नोकरीसाठी दारोदार फिरताना मी पहिले आहे. त्यांचे ऋण फेडण्याची वेळ असून खूप मेहनतीने यशाचा टप्पा पार करायचा आहे. वेळ मिळेल तेव्हा मन लावून अभ्यास करायचा. कोणासोबत तुलना करायची नाही. यश नक्की मिळेल, असा यशाचा मंत्र समृद्धीने सांगितला.