आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; २ महिलेची सुटका; मॅनेजरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:20 AM2024-04-19T11:20:17+5:302024-04-19T11:20:50+5:30
आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रात बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले
धनकवडी : बालाजीनगरमध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला असून दोन पीडित महिलांची तेथून सुटका करण्यात गुन्हे विभागाच्या पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी मसाज सेंटरची मॅनेजर रीना ॲबले डेनियल (वय ३६, रा. गाडगे महाराज वसाहत, राजीव गांधीनगर, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत महिलापोलिस हवालदार मनीषा सुरेश पुकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रीना ॲबले डेनियल याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला बुधवारी बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बालाजीनगर बसस्थानकाजवळील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये दिशा आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजले.
त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दिशा आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रावर छापा टाकला असता, दोन पीडित महिला तेथे मिळून आल्या. रीना ॲबले डेनियल ही पीडित तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत होत्या. दोनही महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानू भजनावळे करत आहेत.