बारामती एमआयडीसीत लॉजवर वेश्याव्यवसाय उघड; तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 10:14 AM2022-09-13T10:14:34+5:302022-09-13T10:14:58+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई....
बारामती :बारामती ग्रामीण पोलिसांनी बारामती एमआयडीसीतील एका लॉजवर सुरू असणारा वेश्याव्यवसाय उघड केला आहे. येथील लॉजिंगवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा मारत कारवाई केली. यावेळी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पोलीस हवालदार गणेश शिवदास काटकर यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी किरण बापू पाटील (मूळ रा. हाजी मलंग रोड, कल्याण पूर्व, सध्या रा. एकवीरानगर, पिसवली, ता. भिवंडी), युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण (रा. राजलक्ष्मी लॉज) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह त्यांच्या पथकाने शनिवारी (दि. १० सप्टेंबर) झालेल्या या कारवाईत भाग घेतला. आरटीओ कार्यालयाजवळ असणाऱ्या येथील राजलक्ष्मी हॉटेल, परमिट रूम, बार व लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती इंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार पंच व बनावट ग्राहकांना सोबत घेत पथक या भागात पोहोचले. बनावट ग्राहकाकडे काही नोटा देत त्याचे क्रमांक नमूद करून घेण्यात आले. त्याने लॉजिंगवर जात वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केली. १२०० रुपये दर त्याला सांगण्यात आला. त्यानुसार त्याने पैसे देत पथकाला इशारा केला. पथकाने येथे जात छापा मारला असता व्यवस्थापक किरण पाटील याला ताब्यात घेतले.
एका खोलीतून दोन महिलांची सुटका केली. त्यातील एक महिला ओडिशा तर दुसरी आसाम राज्यातील आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी रोख रकमेसह मोबाइलही जप्त केले आहेत. पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाटील याला अटक करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.