खराडीत स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:56 AM2024-04-21T11:56:23+5:302024-04-21T11:57:23+5:30
मसाज पार्लरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले
पुणे : खराडी भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३ महिलांची सुटका केली आहे. महिलांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी स्पा मॅनेजरला अटक केली.
सुरेश दीपक इंगळे (२८, रा. प्रगतीनगर, काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजर नाव आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस हवालदार रेश्मा कंक यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यात १ लाख १० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
अधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला बुधवारी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ग्रांट रोड कमर्शिअल झोन, गेरा इम्पेरियम अल्फा, खराडी येथील तिसऱ्या मजल्यावर द रिलिफ स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे. त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले.
पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून ३ महिलांना ताब्यात घेतले. स्पा मॅनेजर सुरेश इंगळे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत हाेता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड करत आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्यासह पथकाने केली.