Pune: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पाच जणांवर कारवाई, चार तरुणींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:29 PM2022-08-05T12:29:58+5:302022-08-05T12:30:12+5:30
पाेलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई करून दाेन मॅनेजरसह स्पा मालक, स्पा सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : साळुंके विहार परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. या प्रकरणी ५ जणांवर कारवाई करीत चार तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.
स्पा मॅनेजर झारणा ऊर्फ पिंकी गाैतम मंडल (वय २७, रा. काेंढवा, मूळ रा. पश्चिम बंगाल), मॅनेजर सुमित अनिल हाेनखंडे (वय २१, रा. काेंढवा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्पा मालक रचना संताेष साळुंखे (रा. येवलेवाडी), सार्थक लाेचन गिरमे (रा. वानवडी) व लाेचन अनंता गीरमे (रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानवडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत साळुंखे विहार या उच्चभ्रु परिसरात ‘गाेल्डन टच स्पा’ नावाचे मसाज सेंटर आहे. या सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने माहितीची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठविला असता, पीडित तरुणींकडून मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा रक्कम घेऊन वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पाेलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई करून दाेन मॅनेजरसह स्पा मालक, स्पा सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातून सुटका केलेल्या तरुणींपैकी एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल व दाेन महाराष्ट्रातील आहेत.
अपर पाेलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, पाेलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, हवालदार नीलम शिंदे, राजश्री माेहिते, अजय राणे, पोलीस अंमलदार इरफान पठाण, हणमंत कांबळे, सुरेंद्र साबळे, साईनाथ पाटील, अमित जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.