बाणेरमध्ये थाई मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून ३ तरुणी ताब्यात; मसाज पार्लर चालकावर गुन्हा
By नितीश गोवंडे | Updated: December 4, 2024 17:51 IST2024-12-04T17:49:24+5:302024-12-04T17:51:00+5:30
मसाज पार्लरचा चालक तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले

बाणेरमध्ये थाई मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून ३ तरुणी ताब्यात; मसाज पार्लर चालकावर गुन्हा
पुणे : बाणेर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले, तसेच मसाज पार्लरच्या चालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसाज पार्लरचा चालक सताउद्दीन मोहम्मद दिलावर हुसेन (२२, रा. जुनी सांगवी) याच्यासह अन्य एकजण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील बेकायदा व्यवसाय, जुगार, मटका अड्डे, तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आदेश धुडकावून काहीजण बेकायदा व्यवसाय करत असून, बाणेर भागात ‘मून थाई स्पा’ येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला.
मसाज पार्लरचा चालक तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.