चक्री भूंगा किडीपासून सोयाबीन वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:18+5:302021-07-14T04:15:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यात खरीपामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला चक्री भुंगा किडीपासून वाचवण्याचे आवाहन कृषी विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यात खरीपामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला चक्री भुंगा किडीपासून वाचवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ४३ लाख ५० हजार हेक्टर आहे. दरवर्षी काही प्रमाणात तरी सोयाबीनला ही कीड लागते व नंतर त्यावर नियंत्रण करता येत नाही. संपूर्ण पीक हातचे जाते. त्यामुळेच यावर्षी कृषी विभागाने ऊगवण झाल्यापासून रोपांवर नियमीत लक्ष द्यावे असे शेतकर्यांना सुचवले आहे.
जेथे चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे. कीडग्रस्त पाने फांद्या वाळू लागतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. १५ दिवसात दोन वेळा याचा अवलंब केला तर किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होईल असे कृषी विभागाने म्हटले आहे.
चक्री भुंगा कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते त्यामुळे पुर्ण झाड वाळून जाते. काळजी घेऊनही कीड थांबत नाही असे लक्षात आल्यास शेतकर्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयाबरोबर किंवा कृषी तज्ञांशी संपर्क साधावा असे कृषी विभागाचे आवाहन आहे.