'आम्हाला संरक्षण द्या', कबड्डी खेळाडूच्या खून प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांची गृहमंत्री यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:02 PM2021-10-26T12:02:29+5:302021-10-26T12:02:48+5:30
पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता
पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या कबड्डी खेळाडू क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण पुणे हादरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. त्यानंतर ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत या मुख्य आरोपीसह ३ अल्पवयीन मुलांना देखील बिबवेवाडीपोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात आज क्षितिजाच्या कुटुंबीयांच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे. आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
''सदरच्या खुनाचा खटला हा फास्टट्रॅक न्यायालयांमध्ये चालवण्यात यावा व विशेष सरकारी वकील म्हणून कुटुंबियांच्या वतीने हेमंत देवराम झंजाड यांची महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्त करावी. तसेच मुलीच्या कुटुंबियांना आरोपीपासून जीविताला धोका आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशीही मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.''
अजित पवारांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुलीला वाहिली होती श्रद्धांजली
''पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. शाळेत शिकणाऱ्या कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे असं पवार म्हणाले होते.''
एकतर्फी प्रेमातून झाला होता हा प्रकार झाला
क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. काल सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. ज्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला होता. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला होता. त्यानंतर मुख्य आरोपीसह ३ अल्पवयीन मुलांना देखील बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते