सैनिकांनी केलेला गोळीबार हा संरक्षणासाठी : लेफ्टनंट जनरल देवराज अंबू; चौकशी नंतर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:12 PM2018-01-31T15:12:18+5:302018-01-31T15:16:51+5:30
जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.
पुणे : ‘‘जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. हा गोळीबार सैनिकांनी स्वत: च्या आणि लष्कराच्या संसाधनांच्या रक्षणासाठी केला. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे, असे असले तरी लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.
बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
अंबू म्हणाले, जम्मु काश्मिरमध्ये जवानांवर स्थानिकांचा एक समूह चालून आला. जवानांनी त्यांच्या सरंक्षणासाठी केला. यापुढेही अशी परिस्थिती आल्यास सरकारी मालमत्तेच्या रक्षणासाठी लष्कर असे निर्णय घेईल.
सीमेवरील होणारी घुसखोरी आणि गोळीबाराबाबत अंबू म्हणाले, की राजुरी भागात काल पाकिस्तानकडून गोळीबार झाला. गेल्या काही दिवसांत भारतीय सीमेवर गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. घुसखोरांना भारतीय सीमेत प्रविष्ठ करण्यासाठी पाकिस्तान कडून या प्रकारची फायरिंग केली जाते. मात्र, भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत असून घुसघोरांना धडा शिकवत आहे. सीमेवर भारतीय लष्कराची परिस्थीती भक्कम आहे. कुठल्याही परिस्थितीशी सामोरे जाण्यास लष्कर तयार आहे.
२०१७ मध्ये २१३ दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मु काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवामुळे मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांवर लष्कराने नियंत्रण मिळवले आहे. घुसखोर असो वा दहशतवाद लष्कर त्यांच्या विरोधात कठार पावले उचलत आहेत. २०१७ मध्ये जवळपास २१३ दहशदवादी मारले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांचे नेतृत्व हे सीमेपलिकडून येत आहे. ते स्थानिक युवकांना भडकवण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांच्यावरही नियंत्रण मिळवण्यास लष्कराला यश आले आहे.