पालिका सुरक्षेचा बोजवारा
By admin | Published: January 6, 2016 12:54 AM2016-01-06T00:54:33+5:302016-01-06T00:54:33+5:30
देशभरात सार्वजनिक इमारतींवर हल्ले होत असताना पुण्याचे नाक असलेल्या महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सुरक्षा व्यवस्थेचा मात्र बोजवारा उडाला आहे.
पुुणे : देशभरात सार्वजनिक इमारतींवर हल्ले होत असताना पुण्याचे नाक असलेल्या महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सुरक्षा व्यवस्थेचा मात्र बोजवारा उडाला आहे. कोणीही, केव्हाही, कसेही जात-येत असलेल्या या इमारतीत कसलीही तपासणी होत नाही, कोणालाच कधी हटकले जात नाही व संशयास्पद म्हणून कधीही कोणाची चौकशीही होत नाही. मुख्य प्रवेशद्वारांवर बसवलेल्या धातूशोधक चौकटी शोभेपुरत्याच उरल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी जर्मन बेकरीवर झालेल्या हल्ल्यामुळे दहशतवादी पुण्यात येऊन पोहोचल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुण्यातील अशा सार्वजनिक इमारतींच्या सुरक्षेची काळजी घेणे सुरू झाले. पालिकेची मुख्य इमारतही त्याला अपवाद नाही. रोज हजारो नागरिकांची तसेच कर्मचाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची या इमारतीमध्ये जा-ये असते. त्यानुसार सुरक्षेची व्यवस्था केली आहे. प्रशासकीय व पदाधिकाऱ्यांच्या अशा दोन इमारतींमध्ये जाण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. दोन्हीकडे धातूशोधक चौकटी आहेत; मात्र आलेल्याने या चौकटीमधूनच जावे असे काहीही बंधन नाही.
पदाधिकाऱ्यांच्या इमारतीमधील धातूशोधक चौकटीच्या बाजूलाच एक टेबल आहे. चौकटीतून येणाऱ्यांकडे धातूची काही आक्षेपार्ह वस्तू असेल तर या चौकटीतून लगेचच आवाज येतो. या आवाजाची नोंद घेण्याकरिता म्हणून त्या टेबलवर किमान दोन जणांनी बसलेले असणे आवश्यक आहे. मात्र, तिथे कोणीही बसलेले नसते. अधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावर तर अशी कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे तिथून कोणीही कसेही जात-येत असते. दोन्ही इमारतींमध्ये चौकटीतून कोणी गेले नाही तर त्यांना हटकायलाही कोणी नसते. बहुतेक मोठ्या इमारतींमध्ये आत आलेल्या व्यक्तीकडे बॅग असेल तर त्या बॅगचेही स्कॅनिंग करणारी व्यवस्था असते. अशी कोणतीही व्यवस्था पालिकेत नाही. त्यामुळे कोणीही हातात कितीही मोठी वस्तू घेऊन जाऊ शकते. महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या कक्षाकडे जातानाही एक अशीच धातूशोधक चौकट आहे. पण तपासणीसाठी कोणीच नसते.
संस्थेचे कर्मचारी, अधिकारी ओळखता यावेत यासाठी अलीकडे बहुतेक मोठ्या संस्थांमधून ओळखपत्र दर्शनी दिसेल असे लावणे अधिकाऱ्यांपासून साध्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना बंधनकारक केलेले असते. पालिकेत मात्र अशी काहीही व्यवस्था नाही. अनेक अधिकाऱ्यांचे, विशेषत: पदाधिकाऱ्यांकडे नियुक्त असलेले कर्मचारी साहेब कार्यालयात नसतील तर पालिकेत फिरत असतात. पालिकेत स्वतंत्र सुरक्षा विभाग आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी असे स्वतंत्र पद आहे. सध्या त्याचा अतिरिक्त कार्यभार क्षेत्रीय कार्यालयात बसणाऱ्या सहायक उपायुक्तांकडे आहे. या विभागाच्या कामाचा आढावच कधी त्यामुळे घेतला जात नाही. सुरक्षा सारख्या अलीकडच्या काळात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या विभागाचा कारभार त्यामुळेच राम भरोसे झाला आहे. (प्रतिनिधी)