जमिनी लुटणाऱ्या गुंड, गुन्हेगारांना पोलिसांकडून संरक्षण; आमदार दिलीप मोहिते पाटलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:07 PM2021-09-01T20:07:34+5:302021-09-01T20:09:28+5:30
एमआयडीसीमुळे चाकण परिसराचा विकास झाला. मात्र, त्यासोबत येथे गरिबांच्या जमिनी लुबाडण्याचे, लुटण्याचे प्रकार वाढले.
पिंपरी : एमआयडीसीमुळे चाकण परिसराचा विकास झाला. मात्र, त्यासोबत येथे गरिबांच्या जमिनी लुबाडण्याचे, लुटण्याचे प्रकार वाढले. अशा व्यक्तिंना पोलिसांकडून संरक्षण दिले जात आहे. कंपन्यांमध्ये माथाडी तसेच कामगार संघटना स्थापन होऊ नये, यासाठी काही कंपन्यांनी चुकीच्या माणसांना जवळ केले. त्यांना पैसे देऊन मोठे केले. त्यामुळे त्यांनी टोळ्या निर्माण करून दहशत निर्माण केली. यातून गुंड पोसण्याचे काम होत आहे. परिणामी एमआयडीसी परिसरात गुंडगिरी वाढली, असा आरोपी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला.
चाकण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महाळुंगे पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी, अंमलदार कक्ष, महिला कक्ष आणि व्यायामशाळेचे लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी (दि. १) झाले. त्यावेळी आमदार मोहिते पाटील बोलत होते.
आमदार मोहिते पाटील म्हणाले, चाकण, महाळुंगे परिसरात एमआयडीसी निर्माण झाल्यानंतर गुन्हेगारी वाढत गेली. माथाडीमुळे जर गुन्हेगारी वाढत असेल तर, माथाडी कायदाच नको. मात्र कामगारांना सुरक्षा हवी. कंपन्यांमधील स्क्रॅप खरेदीसाठी गुन्हेगारांच्या टाेळ्या तयार झाल्या आहेत. कंपनीचे स्क्रॅप मिळविण्यासाठी टोळीयुद्धही झाली आहेत. कंपन्याच याला जबाबदार आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांचे व्यवस्थापक भागीदारीमध्ये स्क्रॅपचा व्यवसाय करतात. आपल्या गोटातील माणसाला ठेका देण्याचे काम हे अधिकारी करतात. त्यातून स्थानिक पातळीवर गुन्हेगारी वाढते.
माझ्यावर चुकीचे गुन्हे टाकले...
चाकण येथे मराठा मोर्चाच्या वेळेस माझ्यावर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. जमिनीशी संबंधित व्यवहारांमध्ये गरिबांवर अत्याचार केला जात आहे. जमिनी व भूखंड लुबाडून, लुटून प्लॉटिंग केले जात आहे. यात काही पोलीस हे गुन्हगारांची साथ देतात. त्यांना पाठीशी घालतात, अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेषांतर करून पोलीस दलातील चुकीच्या बाबींना आळा घालावा, अशी अपेक्षा आमदार मोहिते पाटील यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे व्यक्त केली.