लोकप्रतिनिधींनाच नकोय रस्त्यांची सुरक्षा, जिल्हा समितीबाबत अनास्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:41 AM2019-02-07T01:41:35+5:302019-02-07T01:41:53+5:30
प्रत्येकासाठीच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रस्ता सुरक्षेबाबत लोकप्रतिनिधीच उदासीन आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वर्षभरातील चारही बैठकांना बहुतेक लोकप्रतिनिधींनी दांडी मारली आहे.
- राजानंद मोरे
पुणे - प्रत्येकासाठीच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रस्ता सुरक्षेबाबत लोकप्रतिनिधीच उदासीन आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वर्षभरातील चारही बैठकांना बहुतेक लोकप्रतिनिधींनी दांडी मारली आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना रस्त्यांची सुरक्षा नकोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय सडक परिवहन महामार्ग मंत्रालयाने सप्टेंबर २०१७मध्ये पूर्वीची जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बरखास्त करून नवीन समित्या स्थापन करण्याची अधिसूचना काढली. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये केवळ विविध विभागांच्या अधिकाºयांचा समावेश होता.
पण, नवीन समित्यांची व्याप्ती वाढवून त्यामध्ये सर्व संबंधित विभागांच्या अधिकाºयांसह जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांनाही सदस्य करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हातील ४ लोकसभा खासदारांसह २१ विधानसभा आमदार समितीचे सदस्य आहेत. तसेच, राज्यसभा खासदार व विधान परिषद आमदारही निमंत्रित सदस्य आहेत.
त्यानुसार पुणे जिल्ह्याची समिती खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
मागील वर्षी जानेवारी महिन्यात स्थापन करण्यात आली. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका झालेल्या आहेत.
समितीची काही कामे
जिल्हातील रस्ता सुरक्षेबाबत देखरेख
रस्ते अपघातांची कारणे शोधून उपाययोजना करणे
रस्ते सुरक्षा परिषदेला सूचना करणे
ब्लॅक स्पॉट शोधून उपाय सुचविणे
रस्ता सुरक्षा योजना तयार करणे
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती
समितीतील सदस्य
सर्व खासदार व आमदार
जिल्हाधिकारी
पोलीस अधीक्षक
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष
सर्व प्रांताधिकारी
तीन एनजीओ प्रतिनिधी
जिल्हा शल्यचिकित्सक
शिक्षणाधिकारी
सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी
आरटीओ (सदस्य सचिव)
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा लोकप्रतिनिधींचा हजेरीपट
पहिली बैठक - दि. २० जानेवारी २०१८
उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील
खासदार - अनिल शिरोळे
खासदार - अमर साबळे
आमदार - भीमराव तापकीर
तिसरी बैठक - दि. २९ आॅगस्ट २०१८
उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील
खासदार - अनिल शिरोळे
खासदार - अमर साबळे
आमदार - भीमराव तापकीर
दुसरी बैठक - दि. १८ एप्रिल २०१८
उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील
खासदार - अनिल शिरोळे
खासदार - अमर साबळे
चौथी बैठक - दि. १९ जानेवारी २०१९
उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील
खासदार - अनिल शिरोळे
चारही बैठकांना अध्यक्षांसह केवळ खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. खासदार अमर साबळे यांनी तीन बैठकांना, तर आमदार भीमराव तापकीर यांनी दोन बैठकांना हजेरी लावली. याव्यतिरिक्त एकाही लोकप्रतिनिधीने या बैठकांकडे ढुंकूनही पाहिले नाही.
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यास या समितीला महत्त्व देण्यात आले आहे; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामध्ये समितीला कामांची व्याप्ती वाढविण्यात मर्यादा येत आहेत.