संरक्षक भिंतीच्या कामामुळे घरांच्या भिंतींना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:34+5:302021-06-04T04:08:34+5:30
महापालिकेचे दुर्लक्ष : आंबील ओढ्याशेजारच्या रहिवाशांचा जीव धोक्यात अमोल अवचिते पुणे : सर्व्हे क्रमांक १३३, इंदिरानगर (५२ चाळ) या ...
महापालिकेचे दुर्लक्ष : आंबील ओढ्याशेजारच्या रहिवाशांचा जीव धोक्यात
अमोल अवचिते
पुणे : सर्व्हे क्रमांक १३३, इंदिरानगर (५२ चाळ) या भागात आंबील ओढ्यालगत संरक्षित भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या भिंतीच्या खोदकामामुळे नजीकच्या सुमारे २० ते २५ घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. भिंतीना गेलेल्या तड्यांमुळे घरांची अवस्था धोकादायक झाल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून दिसून आले. मोठ्या पावसात कोणत्याही क्षणी ही घरे ढासळण्याची भीती आहे. यातून मनुष्यहानी व वित्तहानीचा धोका आहे.
इंदिरानगर भागात आंबील ओढ्याची संरक्षित भिंत बांधण्यासाठी गेल्या आठवड्यात खोदकाम करण्यात आले. या कामामुळे यंदा तरी भिंत बांधली जाईल असे स्थानिकांना वाटू लागले. मात्र अचानक घरांच्या भिंतींना तडे जात असल्याचे गृहिणींच्या लक्षात आले. सुरुवातीला केसाच्या आकाराच्या रेघा घराच्या भिंतींना पडल्या. मात्र दोन दिवसांतच या रेघांचे रूपांतर मोठ्या फटी-भेगांमध्ये झाले. त्यामुळे या वसाहतीत दहशत पसरली आहे. खोदकामानंतरच हा प्रकार झाल्याचे स्थानिक सांगतात. महापालिका मात्र याकडे सपशेल डोळेझाक करत आहे.
चौकट
पावसाळ्याच्या तोंडावर दहशत
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आंबील ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले. त्यातच गेल्या पंधरवड्यात तीन-चार वेळा शहरात जोरदार पाऊस झाला. आता भिंतीचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न आहे. त्यातच या अर्धवट कामामुळे घरांच्या भिंतींना तडे गेल्याने रहिवाशांमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर दहशत पसरली आहे.
चौकट
गरिबांच्या जिवाची पर्वा नाही?
ओढ्याशेजारील सोसायट्यांच्या बाजूची संरक्षित भिंत याआधीच बांधली गेली आहे. मात्र गरिबांच्या वस्तीकडील भिंतीचे काम रखडले. त्यासाठी महानगरपालिकेकडे निधी नाही. केवळ पावसाच्या तोंडावर भिंत बांधली जाईल, असे दाखून जीव घेण्याचा प्रकार सुरू आहे. महानगरपालिकेला गरिबांच्या जिवाची पर्वा नाही, असा आरोप स्थानिक रहिवासी करतात.
चौकट
१) “घराच्या भिंतीसह फरशी, स्वयंपाकघराचा ओटा, स्वच्छतागृहातील टाईल्स यांनाही तडे पडले आहेत. नळाचे पाईप फुटले आहे. भिंतींमधून पाणी येत आहे. घरात राहण्याची देखील भीती वाटत आहे.”
-दीपक वाघमारे, नागरिक.
२) “ओढ्याचे खोलीकरण करणे अपेक्षित होते. केवळ राडारोडा काढून ओढ्याच्या बाजूला टाकून देण्यात आला. तोही आताच्या पावसात वाहून गेला आहे. लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका लक्ष देत नाही.”
-अनमोल ओव्हाळ, नागरिक.
३) “आंबिल ओढ्यालगतची अतिक्रमणे गेल्या दोन वर्षापासून आहेत तशीच आहेत. सीमाभिंतींची काही ठिकाणी कामे झालीच नाहीत. पावसाळ्याच्या शेवटी महापालिका अशी कोणती जादूची कांडी फिरवणार ज्यामुळे नागरिकांना त्यांची घरे, किडुकमिडूनक वाचवता येईल? महापालिकेकडे पाठपुरावा करूनही काही कार्यवाही झाली नाही.”
- अनंत घरत, प्रमुख, अर्थ फाउंडेशन.