पुण्यात बाईक टॅक्सीला विरोध...! उद्यापासून पुन्हा रिक्षा चालकांचे बेमुदत चक्का जाम आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 07:38 PM2022-12-11T19:38:52+5:302022-12-11T19:40:48+5:30
बाईक टॅक्सीला सुरू होऊन वर्षभराचा काळ उलटल्यानंतरही रिक्षा चालकांच्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही
पुणे : बाईक टॅक्सीला विरोध दर्शवत ती सेवा बंद करण्यासंदर्भात शहरातील विविध रिक्षा संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे. २८ नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकांनी बेमुदत आंदोलनाला सुरूवात देखील केली होती, मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती नेमली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यावेळी सांगितल्याने रिक्षा चालकांनी संप मागे घेतला होता. त्यानंतर अजूनही बाईक टॅक्सी संदर्भात शासनाने कोणताच अधिकृत निर्णय घेतलेला नसल्याने, तसेच बाईक टॅक्सीवर कारवाई केली जात नसल्याने रिक्षा चालकांनी उद्यापासून पुन्हा बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
बाईक टॅक्सीला सुरू होऊन वर्षभराचा काळ उलटल्यानंतरही रिक्षा चालकांच्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. बाईक टॅक्सी सर्वसामान्यांना परवडणारी असली तरी रिक्षा चालकांच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम पडला आहे. आम्ही देखील याच देशाचे नागरीक आहोत, त्यामुळे आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हा आमचा कायजदेशीर हक्क आहे, आणि आम्ही तो बजावणारच असे बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर, यांनी कळवले आहे. सोमवारी (१२ डिसेंबर) सकाळी ११ वाजल्यापासून आरटीओ कार्यालय परिसरात येऊन आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.