सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला धानोरेकरांचा विरोध

By Admin | Published: May 6, 2017 01:50 AM2017-05-06T01:50:05+5:302017-05-06T01:50:05+5:30

आळंदी शहरातील सांडपाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आळंदी नगर परिषदेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी

The protest against Dhanorekar for the wastewater recycling project | सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला धानोरेकरांचा विरोध

सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला धानोरेकरांचा विरोध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : आळंदी शहरातील सांडपाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आळंदी नगर परिषदेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी शहराशेजारील धानोरे (ता. खेड) हद्दीतील गायरान जागा मिळण्यासंदर्भात ठराव केला होता. मात्र, धानोरे ग्रामस्थांचा या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पास तीव्र विरोध आहे. कोणत्याही अटीवर हा प्रकल्प गावात होऊ देणार नसल्याची भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. गावातील विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी तसा ठरावही एकमताने मंजूर केल्याने यापुढे प्रशासनाची नेमकी काय भूमिका असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आळंदीलगत असलेल्या धानोरे गावात सुमारे १२ हेक्टर गायरान क्षेत्र आहे. या उपलब्ध गायरानातील गट क्र. १५२ मधील काही जागा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारासाठी देण्याबाबतचा ठराव वर्षभरापूर्वी करण्यात आला आहे. तर, २० वर्षांपूर्वी गट क्र. ६४ मधून
महाराष्ट्र राज्य महावितरण वीज कंपनीला व गावात नव्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कामासाठी प्रत्येकी १.६० हेक्टर क्षेत्र देण्यात आले आहे.
उर्वरित गायरान जागेत गावातील पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर, घरकुल, शासकीय कार्यालय, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, सुशोभीकरण कामे मार्गी लावायची आहेत. तसेच, गावातील पाळीव जनावरे चरण्यासाठी गायरानात कुरणक्षेत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे आळंदी पालिकेच्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला आमच्या हक्काची इंचभरही जागा देण्यास गावाचा विरोध राहील.
गावातील नागरिकांची गरज लक्षात घेता, गावातील गायरान जागा महत्त्वाची असल्याने ती गावाकरिता ठेवणे योग्य असल्याचे महाराष्ट्र दिनी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आळंदी नगर परिषदेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचा घाट आमच्या गावात घालू नये, अशी मागणी धानोरे ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नळपाणी पुरवठा, घरकुल, समाजमंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपबाजार समिती अशा विविध विकासकामांकरिता आम्हाला आमची गायरान जागा हवी आहे. त्यामुळे आळंदी पालिकेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प त्यांच्याच जागेत करावा. आमच्या गायरानातील इंचभरही जागा आम्ही या प्रकल्पाला देणार नाही. याबाबतचा पत्रव्यवहार आम्ही शासनाकडे केला आहे.
- सुंदर गावडे, सरपंच, धानोरे

सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प हा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणार आहे. नगर परिषद हद्दीतील जागा या प्रकल्पाला कमी पडत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी धानोरे गावातील सरकारी गायरानातील जागा सुचवली आहे. त्यामुळे धानोरेकरांकडून प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाबाबत शासनच योग्य तो निर्णय घेईल.
- वैजयंता उमरगेकर,
नगराध्यक्षा, आळंदी नगरपरिषद

Web Title: The protest against Dhanorekar for the wastewater recycling project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.