जबाबदारी नाहक लादल्याच्या निषेधार्थ आंदोलन
By admin | Published: July 20, 2015 04:10 AM2015-07-20T04:10:03+5:302015-07-20T04:10:03+5:30
ग्रामपंचायत निवडणूक जबाबदारी नाहक लादल्याच्या निषेधार्थ शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रा. कविवर्य मोरोपंत सभागृहासमोर
बारामती : ग्रामपंचायत निवडणूक जबाबदारी नाहक लादल्याच्या निषेधार्थ शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रा. कविवर्य मोरोपंत सभागृहासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात १०० हून अधिक प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुढील महिन्यात होत आहेत. या निवडणुका पार पाडण्यासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील २०० प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केवळ याच महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने नाहक ग्रामपंचायतीची ‘इलेक्शन ड्युटी’ दिल्याची तक्रार आहे.
प्राध्यापकांना रविवारी निवडणुकीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या वेळी प्राध्यापकांनी केवळ स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर याच ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले. तहसीलदारांनी याबाबत सोमवारी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत प्राचार्यांमार्फत निवेदन देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पुणे जिल्हा प्राध्यापक संघाचे सदस्य प्रा. सुनील लोखंडे यांनी सांगितले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे आम्ही काम करतो. जिल्हा परिषद निवडणुकीचे ही काम केले. मात्र, आता ग्रामपंचायतीची जबाबदारी देण्यात आली आहे. ते करण्याबाबत दुमत नाही. मात्र, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. या प्रकरणी उद्या जिल्हा प्राध्यापक संघामार्फत बैठक घेण्यात येणार आहे. केवळ आमच्या महाविद्यालयाचे २०० जणांची निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. एका प्राध्यापकाला २ ते ३ निवडणुकीच्या जबाबदारीचे आदेश देण्यात आले आहेत. ३ दिवसांचा कालावधी गृहीत धरल्यास महाविद्यालय बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. (प्रतिनिधी)