हैद्राबाद येथील बलात्कार, खून प्रकरणाचे पुण्यात पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 12:35 PM2019-12-01T12:35:14+5:302019-12-01T12:37:14+5:30
हैद्राबाद येथे तरुणीवर बलात्कार करुन करण्यात आलेल्या खूनाचा पुण्यात तरुणांकडून निषेध करण्यात आला.
पुणे : हैद्राबाद येथील एका डाॅक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. ही घटना समाेर येताच देशभरात संतापाची लाट पसरली. याचे पडसाद पुण्यात देखील उमटले. पुण्यातील विविध संघटना एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यात आला. पुण्यातील गाेपाळकृष्ण गाेखले चाैकात तरुण एकत्र येत त्यांनी या घटनेचा निषेध केला. युवक क्रांती दल, युवक काॅंग्रेस, एन. एस. यु. आय, स्टुटंड हेल्पिंग हॅण्ड, जागरुक पुणेकर समिती, जनता दल सेक्युलर आदी संधटना यात सहभागी झाल्या हाेत्या.
हैद्राबाद येथे एका डाॅक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली हाेती. आराेपींनी तरुणीचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.आराेपींना फाशीच्या शिक्षेची मागणी संपूर्ण देशातून करण्यात येत आहे. साेशल मीडियावर देखील या घटनेचा निषेध नाेंदविण्यात आला. याप्रकणी हलगर्जी केल्याप्रकरणी सहायक पाेलीस निरीक्षकासह तीन पाेलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. याप्रकरणी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ट्रकचालक माेहम्मद पाशाला पाेलिसांनी अटक केली. त्यानंतर आणखी तीन आराेपींना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या. आराेपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन पाेलीस काेठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यातील विविध संघटना एकत्र आल्या. शनिवारी संध्याकाळी गाेपाळकृष्ण गाेखले चाैकात एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यात आला. तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी तरुणांनी केली. तसेच ''नारी के सन्मान में हम सब मैदान में'' अशा घाेषणा देखील यावेळी देण्यात आल्या.