खेड शिवापूर टोलनाक्यावरील टोलवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:38+5:302021-04-06T04:09:38+5:30

--- भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते, पूल आदी कामे अपूर्ण असतानाही खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर १ एप्रिलपासून ...

Protest against toll hike at Khed Shivapur toll plaza | खेड शिवापूर टोलनाक्यावरील टोलवाढीचा निषेध

खेड शिवापूर टोलनाक्यावरील टोलवाढीचा निषेध

Next

---

भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते, पूल आदी कामे अपूर्ण असतानाही खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर १ एप्रिलपासून पुढील एक वर्षासाठी ३ टक्के करवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या टोलकरवाढीचा नाका संघर्ष समिती, सजग नागरिक मंच व प्रवासी नागरिकांकडून निषेध करण्यात आला.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सारोळा ते शिंदेवाडी दरम्यान पूल, रस्ते सर्व्हिसरोड ही कामे अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी दुभाजकात झाडे लावलेली नाहीत. तरीदेखील खेड शिवापूर टोलनाक्यावर पुढील एक वर्षासाठी ३ टक्के टोल करवाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना व मासिक पास घेतलेल्या पासधारकांना बसणार आहे.

मागील पंधरा वर्षांपासून पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे, यामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील आतापर्यंत दोन वेळा टोलवाढ करण्यात आली आहेच. आता पुन्हा केलेली टोलवाढ अन्यायकारक असल्याचे प्रवाशी संघटनेने म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन न करता महामार्ग प्राधिकरणाला लेखी निवेदन देणार असल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर व टोलनाका हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष माऊली दारवटकर यांनी सांगितले.

--

चौकट

पंधरा वर्षांपासून काम अपूर्णच

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुंदीकरणाचे काम ३१ मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत सात ते आठ वेळा कामाला मुदतवाढ देण्यात आली. मात्र मागील १५ वर्षांत महामार्गाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे अपूर्ण कामे प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतरच टोलवाढ करावी, खेड शिवापूर येथील टोल नाका हटविण्यात यावा, या भूमिकेवर संघर्ष समिती ठाम असल्याचे समितीच्या वतीने सांगितले.

Web Title: Protest against toll hike at Khed Shivapur toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.