Jalna Maratha Protest: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मंचरमध्ये निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:57 PM2023-09-02T16:57:13+5:302023-09-02T16:58:50+5:30
सरकारने न्याय दिला नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे यांनी दिला आहे...
मंचर : जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी दडपशाही करत लाठीहल्ला केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासने देत आहेत. आज शांतता मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकारने न्याय दिला नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे यांनी दिला आहे.
जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आंबेगाव तालुका व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी लांडे बोलत होते. अंकुश लांडे म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाने ५८ मूक मोर्चा काढले. मात्र, त्याला कुठेही गालबोट लागले नाही. आता मराठा समाज जागा झाला आहे. सरकार निवडणूक आली की आरक्षण देऊ असे आश्वासन देऊन मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करते. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. आज निवेदन देत आहोत, सरकारने योग्य न्याय दिला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असे लांडे म्हणाले.
ॲड. सुनील बांगर म्हणाले, जालना येथे पोलिसांनी जो लाठीमार केला तो पूर्वनियोजित होता. हजारो पोलिस हेल्मेट घालून सज्ज होते. अश्रुधुराचा वापर, गोळीबार करण्यात आला. लाठीहल्ल्यात तरुण, लहान मुले, महिला जखमी झाले आहेत. ही निषेध करण्यासारखी घटना आहे. ज्यांनी लाठीहल्ला करण्याचा आदेश दिला त्यांनी राजीनामा द्यावा व लाठीमार करणाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करावे, अशी मागणी बांगर यांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, सरपंच संगीता शेवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव बाणखेले, अशोक काळे, राजू बेंडे पाटील, आशिष घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे संचालक पप्पूशेठ थोरात, उपसरपंच सोमनाथ काळे, मालती थोरात, प्रवीण मोरडे, रंगनाथ थोरात, विकास जाधव, नीलम टेमगिरे, योगेश हुले, दत्ता पायमोडे आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांना निवेदन देण्यात आले. गणेश खानदेशे यांनी सूत्रसंचालन केले.