Pune Daund Local: पुणे-दौंड-पुणे लोकल सुरू न केल्यास आंदोलन; रेल्वे प्रवासी ग्रामीण संघटनेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:25 IST2025-03-31T15:24:23+5:302025-03-31T15:25:42+5:30
उपोषणाच्या ५ दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास सर्व प्रवासी बांधवांना सोबत घेऊन दौंड रेल्वे स्टेशन येथे चक्का जाम आंदोलन करू

Pune Daund Local: पुणे-दौंड-पुणे लोकल सुरू न केल्यास आंदोलन; रेल्वे प्रवासी ग्रामीण संघटनेचा इशारा
पुणे: पुणे-दौंड-पुणे लोकल चालू करा, अन्यथा डेली अपडाऊन करणाऱ्या सर्व प्रवासी बांधवांना सोबत घेऊन रेल्वे स्टेशनवर (दि. १) एप्रिलपासून बेमुदत उपोषण करू, असा इशारा रेल्वेप्रवासी ग्रामीण संघटनेकडून पुणे रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. उपोषणाच्या ५ दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास सर्व प्रवासी बांधवांना सोबत घेऊन दौंड रेल्वे स्टेशन येथे चक्का जाम आंदोलन करू. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असाही इशारा देण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून दौंड-पुणे-दौंड लोकल चालू होणार असे नुसतेच आश्वासन रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक लोकल चालू होणार यासाठी येथील स्थानिक शेतकऱ्यांनीही रेल्वे प्रशासनाला आपल्या जमिनी दिल्या आहेत. परंतु दौंड-पुणे-दौंड लोकल सुरू न होता केवळ कागदावरच राहिली आहे. त्यामुळे प्रवाशांची हाल होत आहेत. त्यामुळे लोकल सुरू न केला तर आंदोलन करण्याचा इशारा पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष सारिका भुजबळ यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.