SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ब्रिजभूषण सिंह विराेधात निषेध माेर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 11:38 AM2023-06-05T11:38:33+5:302023-06-05T11:39:49+5:30
‘ब्रिजभूषण सिंहला अटक करा’ अशा घाेषणा देत विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला....
पुणे : महिला खेळाडूंचे लैंगिक शाेषणाचे आराेप असलेल्या खासदार ब्रिजभूषण सिंहवर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदाेलनाच्या समर्थनार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांच्यावतीने निषेध माेर्चा काढण्यात आला. ‘महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत’, ‘ब्रिजभूषण सिंहला अटक करा’ अशा घाेषणा देत विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला.
विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या निषेध माेर्चाचा समाराेप सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या तरुणाची हत्या करणाऱ्यांवर कठोर करवाई करावी, तसेच राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची सरकारने दक्षता घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मेणबत्ती पेटवून त्याचा निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव साेमनाथ लाेहार, आझाद समाज पार्टीच्या ॲड. क्रांती सहाणे, इंडियन रिसर्च स्काॅलरचे जयकर गायकवाड, युवक क्रांती दलाचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, सहसचिव सुदर्शन चकाले, राष्ट्रीय काॅंग्रेसचे आदिनाथ जावीर, परमेश्वर अंडील, छात्रभारतीच्या संपदा डेंगळे, नवसमाजवादी पर्याय संघटनेच्या निहारिका भाेसले, सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, आकाश दाैंडे, अनिकेत साळवे, आरती बेरड, झैद शेख , निशांत देशमुख यांच्यासह विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीचे राहुल ससाणे, ओम बोदले , तुकाराम शिंदे, रक्षा पुरोहित, रामदास वाघमारे , समाधान दुपारगुडे आणि विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.