ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी घंटानाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 07:20 PM2018-09-30T19:20:54+5:302018-09-30T19:22:53+5:30
ग. दी. माडगूळकर यांच्या स्मारकाचा पुणे महानगरपालिकेला विसर पडला अाहे. त्यांच्या स्माराकला मूर्त स्वरुप प्राप्त व्हाव यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला.
पुणे : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी सुसज्ज स्मारक उभारण्याच्या घोषणेचा पुणे महापालिकेला विसर पडला आहे. केवळ कागदावर राहिलेली घोषणा प्रत्यक्षात उतरावी आणि स्मारकाला मूर्त स्वरुप प्राप्त व्हावे, ही मागणी पुणेकर रसिकांकडून प्राधान्याने केली जात आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला. ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक झालेच पाहिजे, अशी मागणी करणारी पत्रके सर्वांच्या हातामध्ये होती.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संवादचे सुनील महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे, गदिमांचा नातू सुमित्र माडगूळकर, पणती पलोमा माडगूळकर, राजा महाजन, प्रवीण वाळिंबे, उद्धव कानडे, शिरीष चिटणीस, नंदकुमार काकिर्डे, भाग्यश्री देसाई, मोहन कुलकर्णी, हेमंत मावळे, संतोष चोरडिया, प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘गदिमा आपल्यातून गेल्याला ४१ वर्षे झाली. इतक्या वर्षांत त्यांचे स्मारक साकारता आले नाही हे आपल्या कारभाºयांच्या असंवेदनशीलता, निगरगट्टपणा आणि प्रतिसादशून्यतेचे द्योतक म्हणावे लागेल. गदिमांचे स्मारक हा मराठी रसिकांच्या अस्मितेचा मुद्दा आहे.
महाजन म्हणाले, ‘गदिमांचे स्मारक साकारावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राजकीय व प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत आहे. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी पुणेकरांच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.’
गदिमा स्मारकासाठी जागेचा शोध
गदिमा यांच्या स्मारकासाठी महापालिकेने दिलेली जागा पूर रेषेमध्ये येत आहे. मात्र, स्मारकासाठी नवी जागा शोधण्यामध्ये महापौरांनी लक्ष घातले आहे. काही जागा पाहिल्या आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षास सोमवारपासून (१ आॅक्टोबर) प्रारंभ होत असताना या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे, असे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.