खानावळी सुरु करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या अादिवासी अायुक्त कार्यालयावर अांदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 09:06 PM2018-08-11T21:06:40+5:302018-08-11T21:07:59+5:30
डीबीटी याेजना रद्द करुन वसतीगृहातील खानावळी सुरु कराव्यात या मागणीसाठी एसएफअायकडून 28 अाॅगस्ट राेजी नाशिकच्या अादिवासी अायुक्त कार्यालयावर महाघेराव अांदाेलन करण्यात येणार अाहे.
पुणे : डीबीटी याेजना रद्द करुन वसतीगृहातील खानावळी सुरु कराव्यात या मागणीसाठी एसएफअायकडून 28 अाॅगस्ट राेजी नाशिकच्या अादिवासी अायुक्त कार्यालयावर महाघेराव अांदाेलन करण्यात येणार अाहे. अशी माहिती स्टुडंट्स फेडरेशन अाॅफ इंडियाकडून (एसएफअाय) पत्रकार परिषदेत देण्यात अाली. राज्य शासनाने अादिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील खाणावळ बंद करुन याएेवजी लाभ थेट हस्तांतरण करण्याची याेजना सुरु केल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हाल हाेत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे असा अाराेपही एसएफअायकडून करण्यात अाला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी सरकारने डीबीटी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे वसतीगृहातील खानावळ बंद करून भोजनासाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, हा निर्णय वसतीगृह व्यवस्था मोडीत काढून आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप एसएफआयने पत्रकार परिषदेत केला. या वेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, विलास साबळे, राजू शेळके, नवनाथ मोरे, संदीप मरभळ, रवी साबळे उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांना मासिक निर्वाह भत्ता, वार्षिक शिष्यवृत्ती वेळेवर दिली जात नाही. शैक्षणिक साहित्य वाटपासाठी सुरू केलेली डीबीटी योजनाही अपयशी ठरली आहे. आता वसतीगृहातील खाणावळ बंद करून सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळत आहे. डीबीटीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर विद्यार्थ्यांनी भोजनासाठी मंत्रालयासमोर रांगा लावायच्या का? असा सवालही संघटनेने केला आहे.