'नोकरीत कायम करून घ्या..' शिक्षक दृष्टीहीनांचे शिक्षण आयुक्तालयासमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:59 PM2024-07-08T18:59:42+5:302024-07-08T18:59:54+5:30
न्याय न मिळाल्यास पुणे ते उपमुख्यमंत्री निवास स्थान मुंबई येथे पदयात्रा करणार आहोत आणि येथे जाऊन बेमुदत आमरण उपोषणास बसणार
पुणे : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र च्या वतीने दृष्टीहीन दिव्यांगशिक्षकांना नोकरीत कायम करुन घेण्यासाठी शिक्षण आयुक्तालयासमोर दृष्टिहीनांकडून घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे विभागाचे महासचिव शिवाजी लोंढे यांच्याकडून शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले.
सम्रग शिक्षा अभियानातील (प्राथमिक विभाग) २९८ दिव्यांग विशेष शिक्षकांचा सामायोजनाचा प्रश्न तातडीने सोडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दृष्टीहीन दिव्यांग आंदोलनासाठी पुणे शिक्षण आयुक्तालय या ठिकाणी आले होते.
शिक्षण आयुक्तांना राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार दोन वेळा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. परंतु या प्रस्तावावर कुठलेही प्रकारची अमंलबजावणी झालेली दिसून आली नाही. यामध्ये प्रशासन या प्रस्तावासंदर्भात पूर्णपणे टाळाटाळ करत असून दाद देत नसल्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष जनार्दन कोळसे यांनी सांगितले.
दिव्यांग विशेष शिक्षक समायोजनाचा शासन निर्णय पारित होई पर्यंत माघार घेणार नाहीत. न्याय न मिळाल्यास पुणे ते उपमुख्यमंत्री निवास स्थान मुंबई येथे पदयात्रा करणार आहोत आणि येथे जाऊन बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत. या मध्ये कुठल्याही प्रकारची हाणी झाल्यास याला शासन व प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील. तसेच या दिव्यांग विशेष शिक्षकांना आपण वेठीस धरल्यास दिव्यांग वेगवेगळ्या कृतीचा अवलंब केल्याशिवाय राहणार नाहीत असे पुणे विभागीय उपाध्यक्ष चंद्रकांत खराटे यांनी यावेळी सांगुन प्रशासनाला इशारा दिला आहे.
२०१७-१८ पासून आम्ही याचा पाठपुरावा करत असून जवळपास २९८ शिक्षक हे आजही नोकरीत कायम नाही. त्यांना कायम करुन घ्यावे आणी योग्य ते पगार द्यावी. अंमलबजावणी न झाल्यास आमरण उपोषण करु असे पुणे विभागीय अध्यक्ष जनार्दन कोळसे यांनी यावेळी सांगितले.