‘एनएचएम’ च्या कर्मचा-यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 20, 2023 05:06 PM2023-11-20T17:06:01+5:302023-11-20T17:07:11+5:30
विविध मागणीसाठी बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात आंदोलन केली परंतु सरकारने आज पर्यंत फक्त आश्वासनच दिली, असे संघटनेचे म्हणणे
पुणे : एनएचएम कर्मचारी व अधिकारी यांचे गेले २३ दिवस राज्यभर विविध मागण्या करता बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे. शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा विचार केला नाही. त्याचा निषेध करत शासनाला जाग यावी म्हणून साेमवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पर्यंत भव्य मोर्चा कृती समितीने काढला. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदाेलन केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हे 2005 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले व आरोग्य सेवा देण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान चा वाटा महाराष्ट्रात खूप मोठा आहे. परंतु सेवा देणारे कर्मचारी यांच्या हाती मात्र शासनाकडून नारळच आज पर्यंत देण्यात आला. विविध मागणीसाठी बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात आंदोलन केली परंतु सरकारने आज पर्यंत फक्त आश्वासनच दिली, असे संघटनेने म्हटले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- गेली अठरा वर्ष झाली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी आरोग्य विभागात अविरत सेवा देत आहे. सदर सर्व कर्मचारी यांचे 100% शासन सेवेत समावेशन केले पाहिजे.
- 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी अधिकारी आरोग्य विभागात आपातकालीन सेवा देत आहे. सुरुवातीला सहा ते आठ हजार या तुटपूंज्या मानधनावर काम सूरू करून सद्यस्थितीत त्यांना 17 हजार ते 18 हजार एवढ्या तुटपुंज्या पगारावर कामे करीत आहेत.
- शासनाने २०१८ मध्ये रॅशनलायझेशन करून अठरा ते वीस हजार पगार केले परंतु या रॅशनलायझेशनमुळे ज्या कर्मचाऱ्यांना १० वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना कुठलीही पगारवाढ नाही. तरी सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने ५० टक्के पगार वाढ देण्यात यावी.
- 3 टक्के वेतनवाढ 2014 पासून तात्काळ लागू करावी. आरोग्य विभागात नियमित पदावर जे कर्मचारी सेवा देत आहेत त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारीही सेवा देत आहे. पण सारखीच सेवा दिल्यावर वेतनातील तफावत तात्काळ दूर करण्यात यावी.
- ओरिसा, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब अशा राज्यात एनएचएम कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे ग्रेड पे लागु करा