राज्य शासनाचा निषेध करत ‘मनसे’ने बारामतीत फोडली प्रतिकात्मक दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 07:12 PM2021-09-01T19:12:11+5:302021-09-01T19:14:00+5:30
महाराष्ट्र शासनाला सर्व राजकीय कार्यक्रम चालतात. मेळावे चालतात, हिंदूंचे व मराठी बांधवांचे सण का चालत नाहीत.
बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी(दि.२) बारामतीमध्ये राज्य शासनाचा निषेध करत प्रतिकात्मक दहीहंडी फोडली.बारामती पंचायत समिती चौक येथे यावेळी कार्यकर्ते एकत्र आले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. विनोद जावळे दरवर्षी पंचायत समिती चौकात दरवर्षी राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव साजरा करतात. कोरोनामुळे राज्य शासनाने या उत्सवाला यंदा बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक दहीहंडी शासनाचा निषेध करत अॅड जावळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या वतीने फोडण्यात आली.
महाराष्ट्र शासनाला सर्व राजकीय कार्यक्रम चालतात. मेळावे चालतात, हिंदूंचे व मराठी बांधवांचे सण का चालत नाहीत. या हिंदू विरोधी राज्य शासनाच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करत दहीहंडी फोडण्यात आली. शासनाची दडपशाही हुकूमशाही यापुढे कदापि खपवून घेतली जाणार नाही . शासन कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भीती दाखवून हिंदू सण, उत्सवांवरती निर्बंध लादत आहे. शासन जनतेची दिशाभूल करत आहे.अशा परिस्थितीत मनसे हिंदूंचे सर्व सण संपूर्ण महाराष्ट्रात इथून पुढे साजरी करतील असे यावेळी अॅड. जावळे यांनी सांगितले.
मनसेचे कार्यकर्ते निलेश कदम तालुका व शहर संघटक बाबा सोनवणे, शहराध्यक्ष ऋषी पवार श्रीकांत रोकडे, नितेश थोरात, शिवदत्त, विजय, सोमनाथ पवार, अक्षय काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.