आंदोलन केलं चुकीचं नाही; त्याची चर्चा होणं हे सोयीचं वाटत नाही, कुलकर्णींच्या नाराजीवर घाटेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:03 IST2025-04-07T16:59:16+5:302025-04-07T17:03:35+5:30
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे

आंदोलन केलं चुकीचं नाही; त्याची चर्चा होणं हे सोयीचं वाटत नाही, कुलकर्णींच्या नाराजीवर घाटेंची प्रतिक्रिया
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली, या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत शहराध्यक्षांना पत्र लिहिलंय. मात्र हे पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे शहराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे, या प्रकरणावरून भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांचाच एकमेकांशी मेळ नसल्याचे अधोरेखित झाले आहे. भाजपच्या महिला आघाडीने घेतलेली भूमिका भाजपच्याच खासदारांना न पटल्याने त्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष धीरज घाटेंनीही महिला आघाडीकडून झालेली तोडफोड ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे म्हणत खासदारांच्या भूमिकेला फारसे गांभीर्याने घेतलं नसल्याचे दिसून आले आहे.
घाटे म्हणाले, त्याच्यात काही गैर नाही. कारण एका महिलेचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय. एका महिलेच्या संदर्भात ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे महिलांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदाताई परांजपे आणि त्यांच्या सर्वच टीमने जे आंदोलन केलं असेल त्यात काही चुकीचं असायचं कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये योग्य प्रतिक्रिया त्या दिवशी दिलेली आहे. मी सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी या संदर्भात बोललो त्यांची भूमिका त्यांची बाजू ऐकून घेतली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातलं एक खूप मोठं आणि नावलौकिक असणारं रुग्णालय आहे. अनेक चांगली कामं रुग्णांना सुविधा देणं हे ते गेल्या अनेक वर्ष करताहेत. पण ह्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या संघटनांनी आंदोलनं केली आणि महिला मोर्चा सुद्धा त्या दिवशी त्याठिकाणी येऊन त्यांनी हे आंदोलन केला. मला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे.
त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाही
मला असं वाटतं की माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो तेव्हा पक्षाची एक चौकट असते. पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत. पुण्यात नेतृत्व करणारी चार-पाच जणांची टीम आहे. सर्व आमदार, खासदार, मंत्री आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती व्यक्त होणं. आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाही आहे.