पथारी व्यावसायिकांची कारवाईविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:15+5:302021-09-07T04:15:15+5:30
पुणे : कोरोना आपत्तीत आधीच अडचणीत सापडलेल्या शहरातील पथारी व्यावसायिकांवर सध्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत ...
पुणे : कोरोना आपत्तीत आधीच अडचणीत सापडलेल्या शहरातील पथारी व्यावसायिकांवर सध्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे़ त्यामुळे या विरोधात सोमवारी शहरातील पथारी व्यावसायिकांनी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करीत आंदोलन केले.
यावेळी पथारी व्यावसायिक पंचायतीतर्फे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून कारवाई थांबविण्याची मागणी केली. तेव्हा कुमार यांनी येत्या गुरुवारी सर्व खाते प्रमुखांसोबत बैठक घेऊन याबाबत चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले. सरचिटणीस बाळासाहेब मोरे, इकबाल आळंद, मोहन चिंचकर, प्रदीप पवार, संगीता चव्हाण, बारिकराव चव्हाण, हरिभाऊ बिरादार, जब्बार शेख, रमेश अडसूळ, रवींद्र हुले, सुनंदा घाणेकर, नीलम अय्यर यावेळी उपस्थित होते़
लॉकडाऊनमधून आता कुठे तरी निर्बंध शिथिल झाले असून, शहरातील रस्त्यावरील विक्रेते, परवाना धारक हातगाडीवाले, पथारी व्यावसायिक, स्टॉलधारक आपला व्यवसाय सावरत आहेत. मात्र सध्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू असून, ऐन सणासुदीच्या दिवसात ही कारवाई होत असल्याने हातवरचे पोट असलेल्या व्यावसायिक पुन्हा अडचणीत सापडले असल्याचे बाळासाहेब मोरे यांनी सांगितले़
आंदोलनादरम्यान डॉ. बाबा आढाव यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून अतिक्रमण कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यावेळी महापौरांनी प्रशासनाला सदर कारवाईत परवानाधारक व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात येईल, असे सांगितले़
-------------------------
फोटो मेल केला आहे़