पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध,‘एल्गार’वर धाडसत्र, नक्षलींशी संबंध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:15 AM2018-04-18T00:15:02+5:302018-04-18T00:15:02+5:30
कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांकडून विनाकारण एल्गार परिषद तसेच कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोरेगाव भीमाशौर्य प्रेरणा अभियान समितीच्या वतीने निषेध करण्यात आला.
पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांकडून विनाकारण एल्गार परिषद तसेच कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोरेगाव भीमाशौर्य प्रेरणा अभियान समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे व फुले आंबेडकर विद्वत सभेचे अध्यक्ष प्राचार्य म.ना.कांबळे, रिपब्लिकन भारतचे आकाश साबळे, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे किशोर कांबळे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत भडकावू भाषणे केल्याने कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याचा आरोप ठेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ याप्रकरणात नक्षलवाद्याचा संबंध असल्याच्या संशयावरुन मंगळवारी पहाटेपासून पुणे, मुंबई आणि नागपूर येथे कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे घातले.
प्राचार्य म़ ना़ कांबळे म्हणाले, सरकार भेदभाव करीत आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही चौकशीसाठी बोलावले नाही़ कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी अटक केली होती़ त्यातून ते जामीनावर सुटले आहेत़ आंबेडकरवादी गटाकडून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे़ त्यावरील लक्ष दुसरीकडे वेधण्यास कबीर कला मंच तसेच आंबेडकरी चळवळतील कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहे, हे दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एल्गार परिषद सर्वांसमोर व सर्व परवानग्या घेऊन आयोजित केली होती़ सर्व भाषणांची ध्वनीफित उपलब्ध आहे.
नक्षलवाद्यांशी संबंधितांवर एटीएस कारवाई करते. पण ही कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे़ या कारवाईत पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही़ अशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या घराची झडती घेतली जात असेल तर डॉ़ नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात सनातनच्या सहभागाचा आरोप होत आहे. सरकारची हिंमत असेल तर सतातनच्या कार्यकर्त्यांच्या घराची झडती घ्यावी़, असे आव्हान यावेळी देण्यात आले.
शनिवारवाडा येथील एल्गार परिषदेत भडकावू भाषणे व गाणी म्हटल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी ६ ठिकाणी छापे घालून झडती घेतली आहे़ जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या घरांवर कुठलेही छापे घालण्यात आले नाहीत़
-रश्मी शुक्ला, आयुक्त, पुणे पोलीस