'देश के गददारोंको, गोली मारो सालोंको’; FTII च्या विद्यार्थ्यांची अनुराग ठाकूर यांच्याविरोधात मूक निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 06:37 PM2022-05-05T18:37:39+5:302022-05-05T18:37:48+5:30
एफटीआयआयचे खासगीकरण थांबवावे आणि विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत
पुणे : ‘देश के गददारोंको, गोली मारो सालोंको’ असे निवडणुकीतील एका रँलीमध्ये वक्तव्य करणा-या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना गुरूवारी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेतील विद्यार्थ्यांचा रोष पत्करावा लागला. ‘वुई स्टँड अगेंस्ट पॉलिटिक्स ऑफ हेट’, ‘मिनिस्टर ऑफ हेट यू आर नॉट वेलकम’ अशा स्वरूपाचे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी ठाकूर यांच्या विरोधात मूक निदर्शने केली.
मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा यांना विद्यार्थी निदर्शने करणार आहेत असे कळताच या कृतीने संतप्त होत, जर तुम्ही निदर्शने केली. तर मंत्रालयाकडून एफटीआयआयसाठी तरतूद केलेल्या निधीमध्ये कपात केली जाईल. आणि विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात मंत्रालय जाईल. अशी धमकी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली, असे एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने सांगितले.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर एफटीआयआयमध्ये ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, संस्थेने केलेली शुल्कवाढ, पायाभूत सुविधा, नियामक मंडळात विद्यार्थी प्रतिनिधीचा असलेला अभाव या गोष्टी विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. यातच देशात जातीय तेढ निर्माण करणा-या मंत्र्याचे संस्थेत केलेले जाणारे स्वागत खटकल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी संस्थेचे पदाधिकारी आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मंत्र्यासमोर मांडायचे होते. मात्र विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी मज्जाव केला जात होता. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडे सातत्याने विनंती केल्यानंतर दोन मिनिटे त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ’शुल्कवाढ रदद केली जावी आणि सर्वासामान्यांना परवडेल असे शिक्षण द्यावे, एफटीआयआय इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय दर्जा द्यावा, मेससाठीचे अनुदान परत सुरू करावे, दर्जेदार शिक्षण मिळावे आणि एफटीआयआयचे खासगीकरण थांबवावे आणि विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. तुम्हाला या समस्या का वाटतात? असा सवाल ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केला असल्याचे स्टूडंट असोसिशनतर्फे सांगण्यात आले.
''अनुराग ठाकूर यापूर्वी कधी संस्थेमध्ये आलेले नाहीत. त्यांनी पूर्वी राजकीय रँलीमध्ये अल्पसंख्यांकांना लक्ष्य करीत काही वक्तव्य केली होती. देशात जातीय विद्वेष पसरविणारे त्यांचे विचार आम्हाला मान्य नाहीत. त्याचा आम्ही निषेध करतो. हे आम्हाला दर्शवायचे होते. ठाकूर यांनी आम्हाला दोन मिनिटे संवाद साधण्यासाठी वेळ दिला. संस्थेमध्ये सुरक्षा अधिका-यांना विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. मुलींना कुठं चाललात असे प्रश्न विचारले जातात. हे सर्व मुददे आम्ही त्यांच्यासमोर मांडले असल्याचे अवंती बसर्गेकर ( अध्यक्ष, एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन) यांनी सांगितले.''