अभिमानास्पद! दिल्लीतील पथसंचलनात पुण्यातील चार नृत्य समूह होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:42 AM2023-01-24T09:42:02+5:302023-01-24T09:42:12+5:30
विद्यार्थिनी पंचतत्त्वामधून नारी शक्तीचा संदेश देणार
पुणे : प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण झालेल्या दिल्ली येथील पथसंचलनात पुण्यातील चार नृत्य समूहांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. यातील कलाकारांनी जल्लोषात तालीम सुरू केली आहे.
दिल्ली येथे गुरुवारी (दि. २६) साजरा होणाऱ्या संचलनात टांझ कथक अकॅडमी, मनीषा नृत्यालय, अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक यासह उस्ताद जाफर मुल्ला खान व अविनाश बेलसरे यांचे शिष्य सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्ली येथील अंतिम फेरीत देशभरातील कलाकारांच्या निवड प्रक्रियेतून नृत्य समूहातील नृत्य कलाकारांची निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांसह विविध मान्यवरांसमोर नृत्य सादरीकरण करणार आहेत. चार नृत्य समूहातील नृत्य कलाकार ज्येष्ठ नृत्य गुरु मनीषा साठे, नृत्य गुरु तेजस्विनी साठे, अमृता गोगटे -परांजपे, उस्ताद जाफर मुल्ला खान व अविनाश बेलसरे यांच्या विद्यार्थिनी आहेत.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या ’वंदे भारतम’ या स्पर्धेतील ऑनलाइन फेरी, राज्यस्तरीय फेरी (मुंबई), प्रादेशिक फेरी (नागपूर) आणि दिल्ली येथील अंतिम फेरी अशा देशभरातून घेतलेल्या विविध पातळीवरील निवड प्रक्रियेतून 7000 पेक्षा अधिक स्पर्धकांमधून विजयी होऊन कर्तव्य पथावर या नृत्य कलाकार पोहोचल्या आहेत.
नृत्य गुरू तेजस्विनी साठे यांनी 26 जानेवारी 2022 ला झालेल्या संचलनात प्रमुख नृत्य दिग्दर्शक म्हणून 450 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. साठे यांच्या टांझ कथक अकॅडमीचे हे दुसरे वर्ष असून, यंदा साठे यांच्या सई गोखले, मृणाल वैद्य, अनुशा बावणकर, रमणी भालेराव, आर्वी बेंद्रे, ईशा रानडे आदी विद्यार्थिनी पथसंचलनात सादरीकरण करतील. मनीषा नृत्यालयातील मधुरा आफळे, वैष्णवी निंबाळकर, चैत्राली उत्तुरकर, कीर्ती कुरंडे, मैथिली पुंडलिक, आयुषी डोबारिया आदी विद्यार्थिनी, तर अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक ग्रुपमधील अदिती फडके, मधुरा इनामदार, अपूर्वा मुळ्ये, समृद्धी लेले, साक्षी जोशी, स्वरूपा भोंदे, हिमांशी झंवर आदी विद्यार्थिनींचा सहभाग असेल. उस्ताद जाफर मुल्ला खान व अविनाश बेलसरे यांच्या मैत्रेयी निर्गुण, समृद्धी पुजारी, अपूर्वा सोलापुरे , रेवती संत, राधिका भिंगे आदी विद्यार्थिनी सहभाग घेणार आहेत.
पुण्यातील चार ग्रुपची निवड झाल्याची गोष्टी अभिमानास्पद
मी मागील वर्षी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली होती. तो अनुभव खूप छान होता. यंदा पथसंचलनात पुण्यातील चार ग्रुप सादरीकरण करणार आहेत. नारी शक्ती ही कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे. पंचतत्त्वामधून ते नारी शक्तीचा संदेश देणार आहेत. कलेद्वारे देशासाठी काहीतरी समर्पण केल्याचा भावना या चार ग्रुपमधील कलाकारांमध्ये आहे. माझ्या काही विद्यार्थिनी यंदा सादरीकरण करणार आहेत. पुण्यातील चार ग्रुपची निवड झाल्याची गोष्टी अभिमानास्पद आहे. चारही ग्रुपमधील विद्यार्थिनी मोठ्या मेहनतीने सराव करीत आहेत. - तेजस्विनी साठे, नृत्य दिग्दर्शिका.