अभिमानास्पद..! पुणेकरांच्या ‘ब्लॅक ॲन्ड व्हाइट’ फोटोला सर्वोच्च सन्मान
By श्रीकिशन काळे | Published: November 25, 2024 06:22 PM2024-11-25T18:22:35+5:302024-11-25T18:28:01+5:30
पुण्यातील राहुल सचदेव, एम.एस. रंगनाथन यांना जागतिक स्तरावर गौरव
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार राहुल सचदेव आणि एम. एस. रंगनाथन यांनी प्रतिष्ठेच्या हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्डमध्ये (एचआयपीए) सर्वोच्च सन्मान मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण फोटोग्राफी स्पर्धांपैकी एक म्हणून एचआयपीए फोटोग्राफी स्पर्धा ओळखली जाते. विशेष म्हणजे १०० हून अधिक देशांमधील हजारो छायाचित्रकार स्पर्धेत दरवर्षी सहभागी होतात.
राहुल सचदेव हे पुण्यातील प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार असून त्यांनी टिपलेल्या पांढऱ्या गेंड्याच्या छायाचित्राला स्पर्धेतील जनरल कलर कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे. कथानकाच्या मदतीने नैसर्गिक जगतातील टिपलेले क्षण हे राहुल यांच्या छात्राचित्रणाचे वैशिष्ट्य असून त्यांच्या पांढऱ्या गेंड्याचा फोटो परीक्षकांच्या पसंतीस उतरला. स्पर्धेतील यशाबद्दल राहुल सचदेव म्हणाले, "फोटोग्राफी या कलेकडे मी केवळ व्हिज्युअल्स म्हणून पाहत नाही, तर फोटोच्या चौकटीच्या पलीकडे जात भावनिक बंध निर्माण करणारे एक साधन म्हणून पाहतो. माझ्या स्टोरीटेलिंगच्या या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने जणू मान्यता मिळाली असे मी मानतो.”
राहुल सचदेव यांसोबतच या स्पर्धेत अनुभवी वन्यजीव छायाचित्रकार एम. एस. रंगनाथन यांना देखील त्यांच्या ध्रुवीय अस्वलाच्या अप्रतिम छायाचित्रासाठी सस्टेनेबिलिटी कॅटेगरीमध्ये तिसऱ्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. रंगनाथन यांनी राहुल यांच्या मार्गदर्शनाखालीच १५ हून अधिक कार्यशाळांमध्ये भाग घेत सर्जनशीलतेचे नवे आयाम शोधले आहेत.
रंगनाथन म्हणाले, “वन्यजीव छायाचित्रण माझ्यासाठी कथा सांगण्याचे एक सशक्त साधन आहे असे मला वाटते. वन्यजीव छायाचित्रकार म्हणून आपल्याला नैसर्गिक जगाचे सौंदर्य आणि सार अनुभवायला व टिपायला मिळते. मात्र असे असले तरी, ही कला आव्हानात्मक आहे असे मला वाटते.” एकाच स्पर्धेत आम्ही दोन मित्र व सहकाऱ्यांनी अव्वल स्थान मिळविणे हे देखील विलक्षण आनंदाचा अनुभव देणारे असल्याचे राहुल यांनी नमूद केले.