अभिमानास्पद ! संसाराचा गाडा ओढताना दिव्यांगांसाठी रिक्षेची मोफत सवारी देणारी 'सुपर वूमन'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:07 PM2021-02-12T15:07:43+5:302021-02-12T15:18:51+5:30
जयश्री गेल्या आठ वर्षांपासून वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत...
अतुल चिंचली -
पुणे: शहरातील रिक्षावाल्यांबाबत पुणेकरांच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. काही जणांना खूप चांगला अनुभव गाठीशी असतो तर काहींचा मात्र तीव्र नकारात्मक टोन जातो. अशा या मतमतांतराच्या कल्लोळात एक उदाहरण मात्र प्रत्येक पुणेकराला छातीठोकपणे अभिमान बाळगायला लावणारे आहेत. विलक्षण बाब म्हणजे रिक्षाचालक म्हणून काका नाहीतर एक काकू कार्यरत आहेत. संसाराचा गाडा ओढताना अंध अपंगांसाठी त्यांनी सुरु केलेले हे सेवा कार्य कौतुकास्पद आणि तितकेच प्रेरणादायी असे आहे.
जयश्री या भोसरी येथे पती आणि दोन मुलांबरोबर राहतात. पती पत्नी दोघेही रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. रिक्षा व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहेत. जयश्री गेल्या आठ वर्षांपासून वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. पहिली सहा वर्षे त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहनचालक म्हणून काम करत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. कुटुंबाचा सांभाळ करताना समाजकार्य करण्यास वेळ मिळत नव्हता. आता रिक्षा व्यवसायाला सुरुवात झाल्यावर समाजसेवा करण्याच्या दृष्टीने अंध अपंगांना सेवा देत आहेत.
समाजसेवेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारी अनेक महापुरुषांची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. पण आपल्या संसाराचा गाढा चालवत अंध आणि अपंगांसाठी सेवा देण्याचे कार्य जयश्री अब्राहम नावाच्या सक्षम महिला करत आहेत.
अनेक पुढारी, समाजसेवक लोकांच्या समस्या सोडवत असतात. परंतु सद्यस्थितीत दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास, अत्यल्प मूलभूत सुविधा, अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जयश्री यांनी त्यांच्या प्रवासाच्या अडचणी समजून घेतल्या. बस, रेल्वे अशा सरकारी वाहतुकीच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी येतात. हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जयश्री यांनी आपले काम सांभाळून या सेवेला सुरुवात केली.
त्या दिवसभर शहरात रिक्षा चालवण्याचे काम करत असतात. इतर ग्राहकांबरोबरच अंध आणि अपंग नागरिकांना सेवा देण्याचे काम करतात. दिवसातून दोन, चार व्यक्तींना सोडण्याचे काम करत आहेत.
..............................
सकाळच्या वेळेतच असे नागरिक बस स्टॉप, अथवा रिक्षा स्टँडवर थांबलेले असतात. त्यावेळी स्वतः विचारपूस करून त्यांना योग्य त्या पत्त्यावर सोडते. अनेकांनी मोफत सोडल्यावर आशीर्वादही दिले आहेत. तर काहींनी या सेवकार्याचे कौतुक केले आहे.
आधीपासूनच अशा नागरिकांची सेवा करण्याची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याचा आता आनंद होत आहे.
जयश्री अब्राहम