घोटाळे आहेत तर सिद्ध करा, काँग्रेस-राष्ट्रवादीचे भाजपाला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:50 AM2018-10-04T02:50:14+5:302018-10-04T02:50:41+5:30
एलईडी दिवे, डेटा करप्ट : काँग्रेस-राष्ट्रवादीचे भाजपाला आव्हान
पुणे : एलईडी दिवे व डेटा करप्ट यात घोटाळे झाले आहेत म्हणता तर ते सिद्ध करा, असे आव्हान महापालिकेतील विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला दिले. या दोन्ही विषयांसाठी खास सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी त्यांनी महापौरांना पत्र देऊन केली व आमच्या सत्ताकाळात नाही तर तुमच्याच सत्ताकाळात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप केला.
वीजबचतीसाठी शहरात सर्वत्र एलईडी दिवे बसवणे व संगणकातील महत्त्वाची माहिती नष्ट होणे हे महाघोटाळे असल्याची व ते सन २०१६ मध्ये म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या सत्ताकाळात झाले असल्याची टीका भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सोमवारी केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी आव्हान दिले. घोटाळ्यांचा फक्त आरोप करू नका, ते सिद्ध करा, त्यासाठी खास सभा बोलवा, त्यात चर्चा होऊ द्या व जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, हिम्मत असेल तर हे करून दाखवा, असे
जाहीर आव्हानच तुपे, शिंदे यांनी भाजपाला दिले.
शिंदे म्हणाले, ‘‘या दोन्ही योजनांच्या वेळेस महापालिकेत भाजपा विरोधात असली तरीही त्यांनी विरोध केला असल्याची नोंद नाही. राज्यात त्यांचे सरकार होते. मुख्यमंत्री आदेश देत, तत्कालीन गटनेते व त्या वेळचे आयुक्त त्याप्रमाणे काम करत होते. संगणकातील माहिती नष्ट होण्याचा कालावधी पाहिला तर त्या वेळी सत्तेत भाजपाच होती. खास सभा घ्या, त्यात आम्ही सर्व गोष्टी उघड करू. कोणते सॉफ्टवेअर कोणाच्या काळात केवढ्याला, विनानिविदा कसे घेतले गेले, आत्ता आरोप का केला जात आहेत, ते कुठपर्यंत करणार या सर्वच गोष्टी खास सभेत उघड होतील. त्यामुळेच हिम्मत असेल तर त्यांनी या विषयांवर खास सर्वसाधारण सभा आयोजित करावी, त्यात तारखेनिशी सर्व नोंदी जाहीर करण्यात येतील, जनताच त्यावर घोटाळा कोणाच्या काळात कसा झाला त्याचा निर्णय करेल.’’
घोटाळा झाला आहे हे त्यांनी मान्य केले बरे झाले. आता तो सिद्ध करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. त्यांना काम करता येत नाही, ते नाकर्ते आहेत हेच त्यांच्या कबुलीवरून सिद्ध होते आहे. त्यांच्या सत्ताकाळात झाले असे म्हणून त्यांना पळून जाता येणार नाही. सिद्ध करा हेच आमचे आव्हान आहे. त्यासाठीच महापौरांना खास सभा घेण्याचे पत्र दिले आहे. त्यांनी मान्य केले नाही तर संख्याबळाचा उपयोग करून कायदेशीर मागणी करू, सभेत कोणी काय केले त्याची पुराव्यानिशी माहिती देऊ.
- चेतन तुपे, महापालिका विरोधी पक्षनेते,
राष्ट्रवादी काँग्रेस