बोधकथा -निःस्पृहता व निर्भीडपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:23+5:302021-06-04T04:10:23+5:30
फारसे शिक्षण झालेले नव्हते, तरी लहानवयातच केशवरावांनी वळणदार उर्दू लिपी लिहिणे व मराठीतून उर्दूत भाषांतर करणे यावर प्रभुत्व मिळविले ...
फारसे शिक्षण झालेले नव्हते, तरी लहानवयातच केशवरावांनी वळणदार उर्दू लिपी लिहिणे व मराठीतून उर्दूत भाषांतर करणे यावर प्रभुत्व मिळविले होते. कचेरीत आलेले अर्जदार त्यांना मराठीत मजकूर सांगत, केशवराव तो दप्तरी उर्दू भाषेत अशा पद्धतीने भाषांतरित करत की, तहसीलदारांनाही न्याय देताना विशेष कष्ट घ्यावे लागत नसत. याच तहसील कचेरीत अन्य लेखनिक पगाराव्यतिरिक्त दिवसाला पाच-पन्नास रुपयांची वरकमाई करीत. केशवराव यापासून अलिप्त होते. तहसीलदारांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. 'व्यवहार' या गोंडस नावाखाली लाच देणारे व ती घेणारे कारकून व अधिकारीच आत्तापर्यंत पाहिलेले तहसीलदार केशवसारखा मुलगाही असू शकतो हे पाहून थक्क झाले. ते म्हणालेही, 'केशू, असा भोळसट राहिलास तर तुटपुंज्या पगारावर चैनीचा संसार कसा करणार तू? पारतंत्र्यात चार पैसे मिळताहेत तर कमावून घे.'
कष्टाच्या भाकरीलाच खरी दौलत मानणारे केशवराव यावर म्हणाले, 'नाडलेल्यांना लुबाडायचे तेही या पारतंत्र्यात! मग या जुलमी निजाम, मतलबी इंग्रजांच्यात आणि माझ्यात फरक तो काय?'
लहानवयातच हरामाचा पैसा नाकारण्याचे धारिष्ट्य दाखविणारे केशवराव कोरटकर हे रामशास्त्री प्रभुणे, गोपाळ कृष्ण गोखले यांची निःस्पृहतेची परंपरा पुढे चालविणारे हैदराबाद संस्थानातील पहिले मराठी न्यायमूर्ती म्हणून गौरविले गेले.
- प्रसाद भडसावळे