कोर्ले येथे स्वस्त रेशन धान्य उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:16 AM2021-09-09T04:16:09+5:302021-09-09T04:16:09+5:30
भोर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या रायरेश्वर पठारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ येथील शिवमंदिरात घेतली. त्या ...
भोर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या रायरेश्वर पठारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ येथील शिवमंदिरात घेतली. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवमंदिराची पूजा, विधी व देखभाल करण्यासाठी जंगम या लोकांना जमीन देऊन तेथील राहण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली होती. सदर ठिकाणी ३५० लोकांची लोकवस्ती असून येथील नागरिकांना सध्या रायरी गावात जाऊन स्वस्त रेशन धान्य घ्यावे लागत आहे.
भौगोलिकदृष्ट्या या गावात जाण्यास डोंगरमाथ्यावरून तीन किलोमीटर पायी जंगलातून वाट काढत जावे लागते. तरुणवर्ग नोकरीधंद्यासाठी पुणे मुंबईसारख्या शहरात गेले आहेत, तर इथे राहणारे नागरिकांना स्वस्थ धान्य घेऊन डोंगर पायवाटेने पठारावर जाईपर्यंत दमछाक होते. यासाठी जंगम कुटुंबांना रायरेश्वरपासून रायरीपेक्षा जवळ असलेल्या कोर्ले गावात स्वस्त रेशन दुकान उपलब्ध व्हावे यासाठी प्रांताधिकारी कचरे यांना सखाराम जंगम, गोपाळ जंगम, समीर घोडेकर, प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.
--
फोटो क्रमांक : ०८महुडे रेशान धान्य
फोटो ओळी : भोरचे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांना निवेदन देताना जंगम समाजाचे मानकरी.