एसटीची मालवाहतूक करणाऱ्या चालकांसोबत सहकर्मचारी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:53+5:302021-05-25T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाने २१ मे २०२० पासून राज्यात मालवाहतूक सुरू केली. मात्र ० ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने २१ मे २०२० पासून राज्यात मालवाहतूक सुरू केली. मात्र ० ते २०० किमी पर्यंतच्या प्रवासास चालक हा एकटाच असतो. त्याला सहाय्यक कर्मचारीची नितांत गरज आहे. शिवाय ह्या कर्मचाऱ्यांना दोन दिवस सेवा बजावल्यानंतर विश्रांतीसाठी स्वतःच्या डेपोत येणे अनिवार्य आहे. मात्र, त्या कर्मचाऱ्यांना ५ ते ६ दिवस सोडलेच जात नाही. तसेच त्यांना कोणताही भत्ता दिला जात नाही. तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना रोज तीनशे रुपये भत्ता तसेच नियमानुसार ड्यूटी लावली जावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.
मालवाहतूक करताना १० टनांपेक्षा जास्त माल भरला जाणार नाही, अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात १० टनांपेक्षा जास्त माल भरला जातो.
२०० कि.मी. पेक्षा कमी अंतरासाठी चालकासोबत सहकर्मचारी दिला जात नाही. त्यामुळे मालाची चढउतार करताना, गाडी मागे-पुढे घेताना अडचणी निर्माण होतात.
एका विभागाच्या मालवाहतुकीचे वाहन अन्य विभागात गेल्यास कर्मचाऱ्यांना २ दिवसांपेक्षा जास्त थांबवून घेऊ नये, अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात ४ ते ५ व त्यापेक्षा अधिक दिवस कर्मचाऱ्यांना थांबून रहावे लागते. तसेच त्याठिकाणी राहण्याची व नाष्टा/जेवणाची व्यवस्था केली जात नाही.
मालवाहतुकीच्या कामगिरीवरील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे गाडी रखडल्यानंतर आठवडा सुट्टी जागेवरच घेण्याची सक्ती केली जाते. तसेच अन्य विभागात असणारी मालवाहतुकीची गाडी तेथून पुढे मालवाहतूक करण्यासाठी मूळ विभागातून कर्मचारी पाठविले जातात. वास्तविक परिपत्रकीय सूचनेप्रमाणे त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढची वाहतूक करण्याच्या सूचना असताना मूळ विभागातील कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने खासगी गाडीने प्रवास करून मालाच्या ट्रकपर्यंत पोहचावे लागते ही अत्यंत चुकीची बाब आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय आदेशानुसार ५५ वर्षे व त्यापुढील चालकांना मालवाहतुकीसाठी पाठविण्यात येऊ नये.
----------------------
सध्या संचारबंदी सुरू असल्याने एसटी वाहतूक बंद आहे. अशावेळी मूळ विभागात परतीच्या वेळी चालकाला खासगी गाड्यांनी स्वखर्चाने जावे-यावे लागते. तसेच हॉटेल व्यवसाय बंद असल्याने नाष्टा / जेवण इत्यादीची गैरसोय होते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोज तीनशे रुपये भत्ता देण्यात यावा.
संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, पुणे
-----------------