उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:58 PM2019-04-04T23:58:25+5:302019-04-04T23:58:36+5:30
आगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे.
चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या
आगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे. त्याचबरोबर देशात स्थानिक पातळीवर उच्चशिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. जेणेकरून तरुणांचे शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर कमी होईल. सोबतच ज्या क्षेत्राचे शिक्षण घेतले त्यानुसारच रोजगार मिळावा. उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी वाढीव शिष्यवृत्ती द्यावी. परंतु सध्याची परिस्थिती बघता रोजगार आणि शिक्षण हे मुद्दे निवडणूक प्रचारात मागे पडले आहेत.
- राहुल दळवी, विद्यार्थी
आमची मागणी पूर्ण व्हायला हवी
आम्हाला कॉलेजला दुचाकीवरून यावे लागते. त्यामुळे त्याला इंधन लागतंच. त्याचे दर आवाक्यात आणणं ही आमची प्रामुख्याने अपेक्षा आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत, रोजच्या वाढत्या
महागाईनं आमच्या
पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता जगणं अवघड झालं आहे. तर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, महागाई कमी व्हावी ही तर आमची कित्येक वर्षांपासूनची मागणी
आहे. आता तरी आमची मागणी पूर्ण होईल, अशी इच्छा आहे.
- गोपाळ ओझा, विद्यार्थी
महागाई कमी
झालीच पाहिजे
आम्ही पहिल्यांदाच मतदान करतोय. महागाई खूप वाढत चालली आहे. दोन वेळेचं जेवण सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. देशातील जनतेला रोजगार देणारं सरकार असणं आवश्यक आहे. आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणात आवश्यक असलेल्या सवलती मिळणे बंद झाले आहे. त्या नियमित मिळणे आवश्यक आहे. विकास व उत्तम प्रशासन असा चहूबाजूने सर्वसमावेशक विचार करणारा नेता, खासदार आम्हाला हवाय. तरच बहुसंख्य युवक असलेल्या देशातील तरुणांचे प्रश्न सुटतील, असे वाटते.
- अनिकेत मदने, विद्यार्थी
उमेदवार शिक्षित असायला हवा
आज आपल्याला राजकीय पक्ष, त्याने उभा केलेला उमेदवार हे पाहून मतदान करावं लागतं. उमेदवार हा उच्चशिक्षितच असला पाहिजे. आमचा खासदार तरुण असावा, त्यामुळे त्याने तरुणांचे प्रश्न समजून घ्यावेत, बेरोजगारीवर मात करून युवकांना शिलेदार म्हणून प्रोजेक्ट करणारा असावा. उमेदवार शिक्षित व प्रगल्भ असावा. स्थानिक पातळीवरील तरुण-तरुणी, नागरिक यांचे प्रश्न त्यांना समजतील आणि त्या दृष्टीने तसे उपक्रम राबविणारा नेता पाहिजे. तो उच्चशिक्षित असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगल्या योजना तो राबवू शकतो. - रोहित पांडे, युवक
तरुणांना केंद्रस्थानी
ठेवून विचार करावा
निवडणुका धर्म आणि जातिआधारित राजकारणावर केंद्रित झाल्या आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी व्यक्तिगत मुद्यांवरून चिखलफेक ही नेत्यांकडून राजकीय मंचावरून होताना दिसत आहे. ती बंद होणे आवश्यक आहे तरच देशातील वातावरण चांगले राहील. प्रत्येक पक्ष, भारत हा तरुणांचा देश, उद्याचे भविष्य आहे, असे सांगत असतो. परंतु वास्तवात राजकीय नेते आमच्याकडे केवळ मतदार म्हणून पाहतात. म्हणून या निवडणुकीत तरुणांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा विकास कसा होईल, या मुद्यांवर त्यांनी लक्ष द्यावे.
- काजोल बोडरे, विद्यार्थी