महाविद्यालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:15+5:302021-04-29T04:07:15+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनही सकारात्मक आहे. केवळ कर्मचारी व विद्यार्थीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा लस देण्यासाठी पुढाकार असेल, असे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
केंद्र शासनाने १८ वर्ष वयापुढील प्रत्येकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी आरोग्य विभागाकडे असणारे मनुष्यबळ पुरेसे नाही. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. परंतु, एनएसएसचे विद्यार्थीच नाही तर विद्यार्थी संघटना सुद्धा लसीकरण मोहिमेत मदतीसाठी उतरतील. त्यामुळे राज्य शासनाने व विद्यापीठ प्रशासनाने सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड विद्यार्थी संघटनेतर्फे केली आहे.
वय वर्ष १८ पुढील प्रत्येकाला देण्याचा निर्णय झाला असला तरी सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. पुण्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लसीकरण केंद्राला मान्यता मिळाली असून दोन दिवसांपूर्वी या केंद्रातून विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरूवात केली जाणार होती. परंतु, अद्याप या केंद्राला आरोग्य विभागाकडून एकही लस मिळाली नाही.
---
विद्यापीठातील लसीकरण केंद्राला मान्यता मिळाली आहे. परंतु, लसीचा तुटवडा असल्यामुळे अद्याप केंद्र सुरू होऊ शकले नाही. लसीचा साठा प्राप्त झाल्यानंतर या केंद्रासह विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा लस देण्याबाबत पुढाकार घेतला जाईल.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ