आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:46+5:302021-06-05T04:08:46+5:30
---- तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे डिंभे खुर्द येथे मंजूर करावे, या मागणीचे ...
----
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे डिंभे खुर्द येथे मंजूर करावे, या मागणीचे निवेदन आंबेगाव तालुका उपसेना प्रमुख अमोल अंकुश यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांना दिले आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा भीमाशंकर पाटण व आहुपे या तीनही खोऱ्यांमध्ये विखुरला आहे.
या भागातील लोकांच्या सुरक्षा कायदा व सुव्यवस्थेसाठी साठ ते सत्तर कि.मी. असणाऱ्या घोडेगाव येथे पोलीस स्टेशन उभारण्यात आले. या पोलीस स्टेशन अंतर्गत ७३ गावे येत असून या गावांच्या सुरक्षितेसाठी व कायदा सुव्यवस्थेकरिता केवळ २७ पोलीस कर्मचारी नेमले आहेत. या पोलीस स्टेशन हद्दीतील ७३ गावांपैकी दुर्गम आदिवासी भागामध्ये बहुतांश ५२ गावे असून त्यापैकी डिंभे धरणाच्या आतील अतिशय दुर्गम डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये ३७ गावे वसलेली आहेत. त्या लोकांच्या सुरक्षा कायदा व सुव्यवस्थेसाठी डिंभे खु. तळेघर, बोरघर, व भीमाशंकर ह्या चार पोलीस चौक्या केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात त्याचा काहीच वापर सुरु नाही. केवळ भीमाशंकर यात्रा, महाशिवरात्री व श्रावणी सोमवार या दिवसांमध्येच भीमाशंकर पोलीस चौकी सुरू असते. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे या तीनही खोऱ्यांतील लोकांना कायम असुरक्षित वातावरणांमध्ये जीवन जगावे लागत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे ते घोडेगाव हे अंतर सुमारे ७० ते ७५ कि.मी. एवढे आहे, तर भीमाशंकर ते घोडेगाव हे अंतर ५५ ते ६० कि.मी. त्यामुळे भीमाशंकर पाटण व आहुपे या तीनही खोऱ्यांतील गावांपैकी एखाद्या गावामध्ये गुन्हा अथवा अनुचित प्रकार घडल्यास घोडेगाव येथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती देण्यास संपूर्ण एक दिवस निघून जातो.
बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग हे श्रीक्षेत्र भीमाशंकर आहे. वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त, पर्यटक व निसर्गप्रेमी येत असतात. या भागामध्ये पोलीस स्टेशन जवळ नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांची सुरक्षाही रामभरोसे आहे. त्यामुळे ह्या तीनही खोऱ्यांतील गावांच्या सुरक्षिततेसाठी मध्य अशा डिंभे खुर्द येथे पोलीस ठाणे उभारण्यात यावे, अशी मागणी आदिवासी भागातून जोर धरत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन डिंभे खुर्द येथे मंजूर करावे, अशा प्रकारचे लेखी निवेदन आंबेगाव तालुका उपसेनाप्रमुख अमोल अंकुश यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांना दिले. या वेळी युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात व शिवसेनेचे युवा नेते अमित रोकडे उपस्थित होते.
--